आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 'निळे आणि भगवे झेंडे घेतलेल्या दोन गटांमध्ये भांडणे लावून कोरेगाव भीमाच्या विजयोत्सवदिनी अराजकता निर्माण करण्याची तिसऱ्या विचारसरणीची शक्यता होती का?' असा प्रश्न धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांनी गुरुवारी साक्षीदार मनीषा खोसकर यांना केला. त्यावर खाेसकर यांनी हाेकारार्थी उत्तर दिले. तसेच काेरेगाव भीमा येथे १८२१ मध्ये उभारण्यात आलेल्या विजयस्तंभावरील मूळ २६ शहीद सैनिकांपैकी फक्त एकच नाव अनुसूचित समाजातील होते असा खळबळजनक युक्तिवादही त्यांनी काेरेगाव भीमा दंगलीची चाैकशी करणाऱ्या अायाेगासमाेर केला.
माजी न्यायमूर्ती जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांच्या द्विसदस्यीय चौकशी आयोगापुढे सध्या साक्षीदारांची तपासणी सुरू अाहे. एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेल्या असता दगडफेक आणि जाळपोळीचा सामना करावा लागलेल्या, ठाण्यातील मनीषा खोसकर यांची साक्ष गुरुवारी पूर्ण झाली. पोलिसांनी योग्य बंदोबस्त न ठेवल्यामुळे दंगल भडकली, असा अाराेप खाेसेकर यांनी केला हाेता. त्यावर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी उलटतपासणी केली. 'विजयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्यांना जेवण मिळू नये म्हणून परिसरातील गावकऱ्यांनी व पाेलिसांनी जाणीवपूर्वक १ जानेवारी रोजी बंद ठेवला होता या खाेसेकर यांच्या तक्रारीला ठाेस पुरावा त्यांच्याकडे नाही,' असे अॅड. हिरे यांनी आयोगाच्या निदर्शनास आणले. हल्लेखोरांनी जाळलेल्या बसच्या छायाचित्राच्या बातमीचा पुरावा खोसकर यांनी देऊ शकल्या, मात्र परतीच्या मार्गावर पोलिसांनी आपल्याला सहकार्य केल्याची कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, दुसरे साक्षीदार तुकाराम गवाळे यांचीही अॅड. प्रधान यांनी उलटतपासणी घेतली.
ब्राह्मणांबद्दल द्वेष नाही
'पेशवे ब्राह्मण असल्याने विजयस्तंभावरील मानवंदना पेशव्यांचा प्रभाव साजरा करण्यासाठी होती का,' असा प्रश्न अॅड. प्रधान यांनी साक्षीदार खोसकर यांना विचारला. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या समाजावर अन्याय केल्याने ब्राह्मणांबद्दल आपल्या मनात द्वेष आहे का?' असेही त्यांनी उलटतपासणीत विचारले. मात्र, साक्षीदार खोसकर यांनी त्याचा इन्कार करून, ब्राह्मणांबद्दलच्या द्वेष भावनेतून नव्हे, तर ब्राह्मणांविरोधी लढाईत शहीद झालेल्या आमच्या समाजातील सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अाम्ही जात हाेताे,' असे त्या म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.