आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा तपास एनआयएकडे; काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी विरुद्ध भाजप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, सांगली, नागपूर : कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका आहे. तर सत्य बाहेर येण्याच्या भीतीने केंद्र सरकारने असा निर्णय घेतला असावा, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीचे काही नेतेच तपासात उघड होतील, असा प्रत्यारोप भाजपने केला आहे.

अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नव्हे : पवार

शरद पवार म्हणाले, राज्यातील 'त्या' मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना माओवादी असा उल्लेख केला नव्हता. मुख्यमंत्री हे गृहमंत्रीही होते. तेव्हा त्यांना हे का जाणवले नाही की या प्रकरणात माओवादी आहेत. कोरेगावमधील भाषणात नेत्यांनी केवळ अन्यायावर भाष्य केले होते. अन्यायाला वाचा फोडली होती. मात्र अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नाही. एल्गार परिषदेत एका जर्मन कवीची कविता वाचली गेली. तसेच नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठामधील कविताही वाचली गेली. या कवितांमध्ये आग लावण्याची भाषा होती, मात्र ती अत्याचाराच्या विरोधात. आग लावणाऱ्या गोलपीठा काव्यसंग्रहाला राज्य सरकारने पुरस्कार दिला, केंद्राने अशी कविता लिहिणाऱ्या कवीला पद्मश्री दिली. याचा विचार करून लगेच त्यांना (कविता वाचणाऱ्यांना, परिषद भरवणाऱ्यांना) देशद्रोही, माओवादी म्हणून अटक करणे योग्य नाही.

केंद्राच्या हस्तक्षेपाने सत्य बाहेर येण्याबाबत साशंक : शरद पवार

शरद पवार म्हणाले, राज्य सरकारकडून तपास काढून घेणे चुकीचे आहे. राज्य सरकार खोलात चौकशी करणार होते. प्राथमिक पावले टाकली असताना हे करण्याचे कारण काय? केंद्राला अधिकार आहे, पण तो गाजवायचा नसतो. अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने खटले भरले. एल्गार परिषदेसंदर्भातील खटले खोटे आहेत, त्यामुळे संशयाला जागा आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे सत्य बाहेर येण्याची प्रक्रिया प्रभावित होण्याची भीती आहे.

मोदी-शहांच्या अजेंड्याला विरोध करणारे नक्षलवादी ठरतात : राहुल

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. राहुल म्हणाले, मोदी आणि शहा यांच्या द्वेषाच्या अजेंड्याला जे विरोध करतात त्यांना शहरी नक्षलवादी घोषित केले जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरण हे या विरोधाचे प्रतीक आहे.

आताच केंद्राची आठवण का झाली : प्रकाश अांबेडकर

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे, तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केंद्राकडे का पाठवले नाही?

आंबेडकरांच्या साक्षीत भिडे, एकबोटेंचे नाव का नाही?

प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात साक्ष का दिली नाही, याचा खुलासा करावा. नंतरच भिडे व आपले गुफ्तगू असल्याचा आरोप करावा, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

आपलेच नेते उघड होतील याची राष्ट्रवादीला भीती : भाजप

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तपासात उघड होतील याची त्यांना भीती आहे . एनआयए ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेवर शंका घेणे योग्य नाही. एनआयएवर शंका घेणे याचा अर्थ तुमच्या मनात भीती आहे. आपण एसआयटीची चौकशी लावायची आणि चार्ज फ्रेम होऊ द्यायचे नाही, अशी त्यांची इच्छा असावी.

शहरी नक्षलवादाचे मुद्दे कोर्टासमोर : फडणवीस

कोरेगाव भीमा प्रकरणात शहरी नक्षलवादाबाबत जे मुद्दे उघडकीस आले आहेत, ते सर्वोच्च न्यायालयापुढे आहेत. त्यानुसारच आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्ये करून पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न होत आहेत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कोरेगाव भीमा प्रकरण मोदींविरुद्ध षड‌्यंत्र : हुसेन

कोरगाव भीमा दंगल प्रकरण हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धचे षड‌्यंत्र होते, असे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी शनिवारी व्यक्त केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यावरून भाजपवर केलेल्या आरोपावरून हुसेन यांनी हे मत व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...