Home | Maharashtra | Mumbai | KORGAON BHIMA INVESTIGATION COMMISSION WORK START

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज सुरू; पहिल्या दिवशी मनीषा खोसकर यांची साक्ष

दीप्ती राऊत | Update - Sep 06, 2018, 07:44 AM IST

कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या पटेल-मलिक आयोगाचे कामकाज बुधवारी सुरू झाले.

 • KORGAON BHIMA INVESTIGATION COMMISSION WORK START

  मुंबई- कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या पटेल-मलिक आयोगाचे कामकाज बुधवारी सुरू झाले. यात चार साक्षीदार बोलावण्यात आले होते. मात्र, यापैकी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्याण मंडळाच्या सदस्या मनीषा खोसकर यांचा जवाब नोंदवून उलटतपासणी झाली. उर्वरित साक्षीदारांची उलटतपासणी गुरुवारी होईल. सणसवाडीच्या दंगलीत बस जाळल्याच्या प्रकरणात खोसकर साक्षीदार आहेत. आयोगाचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे गुरुवारी सरकारच्या वतीने साक्षीदारांची उलटतपासणी घेतील. बुधवारी पुण्यातील विवेक विचार मंच या संस्थेच्या वतीने अॅड. विजय सावंत यांनी तर धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे व छत्रपती उद्योगाचे जयेश शिंदे यांच्या वतीने अॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदार तपासले. या प्रकरणात संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांचे वकील अॅड. नितीन प्रधान यांनी खोसकर यांची उलट तपासणी घेतली. खोसकर यांनी खोटे प्रतिज्ञापत्र आयोगापुढे सादर केल्याचा युक्तिवाद प्रधान यांनी केला. यावर “आमच्यावर बेतली, मी खोटं कशाला बोलू? तुमच्यावर बेतली असती तर कळाले असते’ अशा शब्दांत खोसकर यांनी आरोपाचा इन्कार केला.


  साक्षीदार खोसकर म्हणाल्या...
  - दगडफेक सुरू आहे, गाडीवरचे निळे झेंडे काढून टाका, असे आम्हाला सांगितले.
  - झेंडे काढत असताना जमावाने आमच्या बसवर दगडफेक केली.
  - माझ्या मुलीला दगड लागत होते, दगडफेक करून नका म्हणून मी गयावया करत होते.
  - तेव्हा पोलिस नव्हते, ठाण्यात आल्यावर आमच्या तक्रारदार पदाधिकाऱ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले.
  - हलकेखोरांचा मी सांगितलेला तपशील पोलिसांनी नोंदवून घेतला नाही.


  अॅड. नितीन प्रधान म्हणाले...
  - घटना पुण्याला आणि तक्रार ठाण्याला हे पटणारे नाही.
  - मंडळाच्या नेत्यांनी सांगितले म्हणून खोटी तक्रार करण्यात आली.
  - एफआयआर आणि प्रतिज्ञापत्र यात तफावत आहे.
  - दलित संघटना आणि माओवाद्यांनी पढवल्यानुसार प्रतिज्ञापत्रात घटनेची अतिशयोक्ती आहे.
  - हे प्रतिज्ञापत्रच खोटे आहे.


  माओवादी माहीत आहेत का, असा प्रश्न आयोगाने खोसकर यांना विचारला. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिल्यावर एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांनी खोसकर यांना ‘नक्षलवादी माहीत आहेत का’ असा प्रतिप्रश्न केला. त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. नक्षलवादी आणि माओवादी एकच की वेगळे यावर चर्चा झाली. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उलटतपासणी करणार असल्याचे प्रधान म्हणाले.


  काय आहे प्रकरण?
  गेल्या १ जानेवारीला कोरेगाव भीमा विजयस्तंभास २०० वर्षे झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमानंतर सणसवाडी (जि. पुणे) येथे हिंसाचार झाला. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दंगल चिघळली, अशा तक्रारी होत्या. त्यावर राज्य सरकारने निवृत्त न्या. जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांचा चौकशी आयोग नेमला.


  आयोग करणार ही चौकशी
  - कोरेगाव भीमा दंगलीवेळी नेमके काय घडले?
  - नेमक्या कोणत्या संघटना त्यास जबाबदार आहेत?
  - परिस्थिती हाताळण्यात पोलिसांची भूमिका काय?

Trending