आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णूर घोटाळा गंभीर प्रकरण; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार : खासदार राजीव सातव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध होणाऱ्या कृष्णूर अन्नधान्य घोटाळा मालिकेची दखल खासदार राजीव सातव यांनी घेतली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती राजीव सातव यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 


खासदार सातव म्हणाले की, कृष्णूर येथे पोलिसांनी १८ जुलैला धाड घालून इंडिया मेगा कंपनीत सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे १० ट्रक पकडले. त्यातील ७ ट्रक हिंगोलीचे तर ३ ट्रक नांदेडचे होते. हे अत्यंत धक्कादायक आहे. समाजातील तळागाळातल्या गोरगरीब लोकांना उपाशी पोटी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी स्वस्त धान्य दुकाने उघडण्यात आली. त्यातून गरिबांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा केला जातो. परंतु सरकारतर्फे येणारे धान्य गरिबाच्या दारापर्यंत जात नसावे, अशी शंका घेण्यास वाव आहे. ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी एका दिवशी दहा ट्रक पकडले याचा अर्थ यापूर्वीही अनेक ट्रक धान्य असेच गेले असावे. खरे तर राज्यातले देवेंद्र फडणवीस सरकार स्वत:ला पारदर्शी म्हणवून घेते. त्यांचा कारभार पारदर्शी आहे, असा त्यांचा सतत दावा असतो. मग कृष्णूर येथे पोलिस कारवाई होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला. परंतु सरकारने याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. हे प्रकरण कोणी एकाने केले असावे असे वाटत नाही. यात मोठी साखळी असण्याचीही शक्यता आहे. पारदर्शी सरकारने याच्या मुळाशी जाऊन कारवाई करणे गरजेचे आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे होते. परंतु ते कारवाई करणार नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन कारवाई करावी व राज्यातील जनतेला सरकार खरेच पारदर्शी आहे हे दाखवून द्यावे, असे आव्हानही खासदार राजीव सातव यांनी दिले. 


नायगाव न्यायालयाचा मेगा अॅग्राे कंपनीला झटका 
कृष्णूर अन्नधान्य घोटाळा प्रकरणात सोमवारी नायगाव न्यायालयाने इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीला झटका दिला. पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे परत मिळावी यासाठी कंपनीतर्फे दाखल केलेला अर्ज न्यायमूर्ती सय्यद बहाबोद्दीन यांनी फेटाळला. बिलोली सत्र न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाने दिलेला हा तिसरा झटका आहे. कृष्णूर येथील मेगा इंडिया कंपनीत पोलिसांनी धाड घालून १८ जुलैला धान्याचे १० ट्रक पकडले. याच वेळी पोलिसांनी मेगा कंपनीतील सर्व कागदपत्रे, रजिस्टर, हजेरी पट, लॅपटाॅप, संगणक, सर्व्हे रिपोर्ट, आयकर विवरण पत्रे, माल खरेदीची बिले अादी साहित्य जप्त केले. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामुळे कंपनीचे कामकाज बंद पडले असून सर्व कागदपत्रे कंपनीला परत करावे असा अर्ज सीआरपीसी कलम ९१ अन्वये नायगाव येथील न्यायालयात दाखल करण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...