आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णूर अन्नधान्य घोटाळा, आरोपीच्या मालमत्ता जप्तीची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- कृष्णूर येथील इंडिया मेगा अनाज अॅग्रो कंपनीवर पोलिसांनी १८ जुलै रोजी टाकलेल्या धाडीनंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले. पोलिसांची पथके त्यांचा माग काढत अनेक ठिकाणी जाऊन आली. तथापि त्यांचा काहीही शोध लागला नाही. त्यामुळे आता फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेला पोलिसांनी सुरुवात केली आहे. यासंबंधात बुधवारी नायगाव येथील न्यायालयात मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  


तुप्पा जवाहरनगर येथील भारतीय अन्न महामंडळाच्या  गोदामातून निघालेले, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शासकीय धान्याचे १० ट्रक पोलिसांनी पकडले. हे सर्व धान्य इंडिया मेगा कंपनीत विक्रीला जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. दहापैकी  सात ट्रक धान्य हिंगोली जिल्ह्यातील तर  तीन ट्रक धान्य नांदेड जिल्ह्यातील होते. पोलिसांच्या कारवाईमुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अडचणीत सापडली. धाडीनंतर पोलिसांनी सार्वजनिक वितरण प्रणालीचे ठेकेदार राजू पारसेवार, इंडिया मेगा कंपनीचे अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनीही हिंगोलीच्या आरोपींचा याच गुन्ह्यात समावेश करावा, असे पत्र दिल्याने खुराणा अँड कंपनीलाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.  

  
सर्व आरोपी फरार :
कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेचा तपास सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचा गेल्या ५५ दिवसांपासून प्रयत्न केला. तथापि त्यांचा शोध लागला नाही. पोलिसांची पथके अनेक ठिकाणी जाऊन आली. परंतु आरोपी सापडू शकले नाहीत. जयप्रकाश तापडिया व राजू पारसेवार या दोन आरोपींनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. परंतु दोन्ही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. त्यानंतर आरोपी स्वत:हून पोलिसांना शरण येतील, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नसल्याने आता फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. याशिवाय अन्य कोणताही पर्याय पोलिसांसमोर उरलेला नाही. मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात बुधवारी न्यायालयात रीतसर तक्रार दाखल केली जाणार आहे.    


भुसाच भुसा : पोलिसांनी धाड टाकल्यानंतर केलेल्या पंचनाम्यात मेगा कंपनीत अजून धान्याची ६ हजार पोती असून तो मालही शासकीय असल्याचे नमूद केले. त्यावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात समिती नेमून कंपनीतील सर्व धान्यातील पोत्याची पाहणी केली. त्यानुसार कुलकर्णी यांनी पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेगा कंपनीत १२ हजार पोती भुसा व १७९८ पोती गहू निघाला. सहा हजार पोती गव्हाची निघाली नाहीत.   


आरोपी परदेशात  गेल्याचा संशय : इंडिया मेगा कंपनीतील अन्नधान्य घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असून यात अनेकांचे हात गुंतले आहेत. त्यामुळे जोपर्यंत वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार व इंडिया मेगा कंपनीचे अजय बाहेती यांची विचारपूस होत नाही तोपर्यंत यातील इतरांचा सहभाग बाहेर येणार नाही. त्यामुळे त्यांची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. तथापि हे प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. 


त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. प्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता यातील आरोपी कदाचित बाहेर देशात गेले असावेत, अशीही शक्यता पोलिस वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...