आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर निपुण 'ओपीडी' समजून गुमान तीन तास कार्यालयात बसा; कृष्णा भोगेंचा आयुक्तांना सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेत दलालांची संख्या जास्त असल्यामुळे आपण मुख्यालयात बसत नाही, असा खुलासा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. दलालांना रोखण्याची जबाबदारी असणारी व्यक्ती असे वक्तव्य कसे काय करू शकते, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. महापालिकेत दलाल वाढले असतील तर आयुक्तांनीच त्यांचा नायनाट करणे अपेक्षित असताना हा माणूस कर्तव्यापासून दूर जात असल्याचे दिसले. त्यावर ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी 'हा तर पोलिसांनी चोरांना घाबरून पळण्याचाच प्रकार' असल्याची टीका करतानाच दररोज ठरलेल्या वेळेत कार्यालयात बसण्याचा सल्ला आयुक्तांना दिला आहे. नागरिक-अधिकारी यांच्यात संपर्क व संवाद जेव्हा असतो तेव्हा दलालांची निर्मिती होत नाही. मात्र जेव्हा याउलट घडते तेव्हा दलालांचा सुळसुळाट होतो, असे भोगे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 


दलालांची संख्या कशामुळे वाढते, याच्या कारणाचा शोध घेतला तर कोणताही आयुक्त मुख्यालयातील आपला मुक्काम वाढवेल. अधिकारी जेव्हा सामान्यांना भेटत नाहीत तेव्हा नागरिकांना नाइलाजाने दलालाची मदत घ्यावी लागते. अधिकाऱ्यांनी सामान्यांना भेटू नये, अशी दलालांची इच्छा असते. कारण जर नागरिक अधिकाऱ्यांना भेटले तर त्यांची कामे थेट होतील आणि दलालांकडे कोणीही जाणार नाही. महापालिकेत जर दलाल वाढले असे आयुक्त म्हणत असतील तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की आपले अधिकारी सामान्यांची कामे करत नाहीत. त्यांना भेटत नाहीत. अधिकारी आपली कामे करत नाहीत म्हणून नागरिकांना दलालाकडे धाव घ्यावी लागते, असे भोगे म्हणाले. 


जास्तीत जास्त वेळ द्या, लोकांना भेटा 
डॉ. निपुण यांना काय सल्ला द्याल, असे विचारले असता भोगे म्हणाले, त्यांनी ओपीडीप्रमाणे ठरावीक वेळ कार्यालयात द्यावा. जास्तीत जास्त अभ्यागतांना भेटावे म्हणजे सामान्यांची कामे होतील आणि दलाली कोण करतो, याची माहितीही नागरिक त्यांना देतील. मात्र दलाल आहेत म्हणून मी कार्यालयातच येणार नाही, अशी भूमिका घेणे चुकीचे आहे. आपल्याला जो पगार मिळतो त्यात नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचाही एक भाग आहे. त्यामुळे तेअधिकाऱ्याचे आद्यकर्तव्यच आहे. 


दलाल सर्वत्र असतात, पण... 
प्रत्येक शासकीय कार्यालयात दलाल असतातच. त्यावर बोलायचे नसते. कार्यालयाचा प्रमुख कसा आहे, यावर दलालांची संख्या अवलंबून असते. प्रमुख सक्षम असेल, कनिष्ठ अधिकाऱ्यांवर त्याचा वचक असेल तर तेथे दलाल शिरण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु चित्र उलटे असेल तर मात्र दलालांचा सुळसुळाटच होतो, असे भोगे म्हणाले. त्यांनी डॉ. निपुण यांचा नामोल्लेख केला नसला तरी मनपातील वाढत्या दलालीला तेच कारणीभूत असल्याचे ध्वनित केले. 

बातम्या आणखी आहेत...