Magazine / अभिजित तुम्ही ‘बी’चुकलेच..

जेव्हापासून अभिजित बिचुकलेंना अटक झाली तेव्हापासून गुगलवर त्यांचा सर्च वाढल्याचं दिसत आहे.

कृष्णा तिडके

Jun 30,2019 12:20:00 AM IST

जेव्हापासून अभिजित बिचुकलेंना अटक झाली तेव्हापासून गुगलवर त्यांचा सर्च वाढल्याचं दिसत आहे. कोण आहे हा अभिजित बिचुकले...? राज्यात असंख्य प्रश्न असताना अभिजित बिचुकले हा विषय "ब्रेकिंग न्यूज' का ठरतोय...? एकूणच अभिजित बिचुकले हे खऱ्या अर्थाने मनामध्ये प्रश्नांचा गुंता निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व आहे.


‘भारताचे भावी पंतप्रधान, कवी मनाचे नेते, युवाभूषण अभिजित आवाडे-बिचुकले दादा’ असा स्वत:चा उल्लेख तो आपल्या बॅनरवर करतो. बरं यात पत्नीलाही त्याने मागे ठेवले नाही. बेळगाव-कारवार-निपाणीसह अखंड महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब सौभाग्यवती अलंकृता अभिजित आवाडे- बिचुकले, अशा बिरुदावलीसह पत्नीचाही बॅनरवर उल्लेख.. आता त्याला एक मुलगा आहे त्याचाही उल्लेखही तो ‘अहंमराजे’ असा करतो. तर असा हा अवलिया अभिजित बिचुकले...


बोलाचीच कढी अन‌‌् बोलाचाच भात.. किंवा खोटं बोला, पण रेटून बोला.. असा एखाद्या व्यक्तीचा पिंड असतो. काही लोक खोटं तर बोलतातच, परंतु अशक्यप्राय वाटेल अशा बड्या-बड्या बाता मारतात. हा प्रकार एखाद्यावेळी काहींच्या अंगलट येतो तर काहींचे यातून फावते. अशाच बड्या बाता मारण्याच्या व्यसनातून सातारा शहरातील एका युवकाला कलर्स वाहिनीच्या "बिग बॉस'मध्ये प्रवेश मिळाला... त्याचे नाव अभिजित आवाडे-बिचुकले. सातारा आणि सांगलीकरांसाठी तसा हा नवा नाही, मात्र "बिग बॉस'मुळे तो आता संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचा झालाय. "बिग बॉस'च्या घरात तो आपली वेगळी छाप सोडत असतानाच एका चेक बाऊन्स प्रकरणात सातारा पोलिसांनी त्याला "बिग बॉस'च्या घरातून अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणासह त्याच्यावर आता खंडणी मागण्याचाही आरोप करण्यात आला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आता त्याला "बिग बॉस'च्या घरात पुन्हा प्रवेश मिळेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे कोण हा अभिजित बिचुकले? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.


‘मागच्या आठवड्यात मला रामोजी रावांचा फोन आला होता. मी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या चॅनलला प्रचंड टीआरपी मिळवून देऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच ते मला भेटण्यास इच्छुक आहेत. परंतु पुढील लोकसभा निवडणुका संपेपर्यंत मला अजिबात वेळ नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलंय. भावा, तू सातारमध्ये नवाच दिसतोय... मला ओळखलं नसशील... तुला कळंल लवकरच.. मी कोण आहे ते! उदयनराजेबी आपला नाद करीत नाय.’


२००८ मध्ये ई.टी.व्ही. मराठीसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी काम करण्यास सुरुवात केली. पत्रकारिता आणि सातारा शहरातही अगदीच नवखा असताना मला भेटलेला हा युवक थेट चॅनलच्या मालकाचाच फोन आल्याचे सांगत असल्याने मी हादरलोच. नंतर मी याबाबत माझ्या सातारकर मित्रांशी चर्चा केली. पाठीवर मोकळे सोडलेले लांबसडक केस, शिडशिडीत बांधा आणि कपाळावर उभा कुंकवाचा टिळा.. असे त्याचे वर्णन मी मित्रांना सांगितले. ‘अारं तुला अभिजित बिचुकले भेटला अासंल. खुळं हाय त्ये, लय मनावर घेऊ नगंस.’ मित्रांनी हसण्यावारी घेऊन अगदी सहजपणे हा विषय टाळला. मला मात्र अभिजित बिचुकलेबाबत उत्सुकता लागली होती. सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी असलेला अभिजित पत्नीसह गुरुवार पेठ भागातील एका छोट्या पत्र्याच्या खोलीत राहत होता. भावी पंतप्रधान अभिजित आवाडे बिचुकले, अशी तो स्वत:ची ओळख सांगतो. त्याने शहरात लावलेल्या बॅनरचीही चांगलीच चर्चा असते. ‘भारताचे भावी पंतप्रधान, कवी मनाचे नेते, युवाभूषण अभिजित आवाडे-बिचुकले दादा’ असा स्वत:चा उल्लेख तो आपल्या बॅनरवर करतो. बरं यात पत्नीलाही त्याने मागे ठेवले नाही. बेळगाव-कारवार-निपाणीसह अखंड महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब सौभाग्यवती अलंकृता अभिजित आवाडे- बिचुकले, अशा बिरुदावलीसह पत्नीचाही बॅनरवर उल्लेख.. आता त्याला एक मुलगा आहे त्याचाही उल्लेखही तो ‘अहंमराजे’ असा करतो. तर असा हा अवलिया अभिजित बिचुकले...


काही महिन्यांपूर्वी तो कलर्स वाहिनीच्या हाती लागला आणि त्याला थेट "बिग बॉस'च्या घरात एंट्री मिळाली. अगोदरच बोलका, त्यात हवेतल्या गप्पा मारायची भारीच हौस (अगोदरच मर्कट त्यात...) असा हा प्रकार. त्यातच आता त्याला मिळालेला "बिग बॉस'चा प्लॅटफॉर्म. हा योग साधल्यानंतर "बिग बॉस'च्या घरात वावरताना त्याच्यातील ‘सातारी तऱ्हा’ दिसली नाही तर मग काय... किंबहुना त्याच्यामुळेच तर या ‘शो’ला चांगला टीआरपी मिळतो आहे. अशातच एका चेक बाऊन्स प्रकरणामुळे सातारा पोलिसांनी गेल्या आठवड्यात अभिजितला "बिग बॉस'च्या घरातून उचलले. त्याच्या अटकेच्या, त्याला न्यायालयात हजर केल्याच्या बातम्यांनी आता "ब्रेकिंग'ची जागा घेतली आहे. त्यामुळे कधी सिंगल कॉलममध्येही आपली दखल न घेणाऱ्या स्थानिक पत्रकारांकडे न्यायालयात जाताना तो वेगळ्याच आविर्भावात पाहत होता. सध्या राज्यात दुष्काळ,पाणीटंचाई,चाराटंचाई असे असंख्य प्रश्न असताना अभिजितला पुन्हा "बिग बॉस'च्या घरात प्रवेश मिळेल का हा प्रश्न मीडियाला सतावतो आहे.


अशी ही फेकाफेकी
राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ' म्हणत सभा गाजवत आहेत... त्यांच्या "कृष्णकंुज'समोरच आपल्याला विराट सभा घ्यायची... सभेची ९५ टक्के तयारी झाली. आता आपण केव्हाही धमाका करू शकतो, एका उद्योजकाची आपली मोठी "डीलिंग' झाली आहे... हजार कोटीचा नवा प्रोजेक्ट आपण सातारमध्ये आणतोय. एकबी पोरगा रिकामा फिरताना दिसणार नाही, प्रत्येकाला काम मिळेल... २०१९ ला महाराष्ट्रातल्या सर्व २८८ जागांवर आपण उमेदवार उभे करतोय. पहिल्या प्रयत्नात आपली सत्ता येणार नाही, मात्र मुख्यमंत्री कुणाला करायचे हे आपणच ठरवणार आहोत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यानुसार अाता चंद्रकांतदादा मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. त्यांच्याऐवजी माझाही विचार होऊ शकतो. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला संमती दिली आहे... अशा अशक्यप्राय आणि मोठमोठ्या बाता मारण्यात बिचुकल्यांचा हातखंडा आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी बिचुकले समोरून येताना दिसला तर "काय चाललंय नेते' असे म्हणून सातारकर त्याला बोलते करायचे. त्यातून थोडीशी 'एंटरटेंटमेंट' होईल म्हणून त्याकडे पािहले जायचे. अलीकडे बिचुकले समोरून येताना दिसला तरी त्याच्या नादी लागायला नको, असे म्हणून सातारकर वाट वाकडी करून पुढे जातात. "बिग बॉस'च्या घरातून जेव्हा पोलिसांनी त्याला उचलले तेव्हा त्याने प्रवासात पोलिसांनाही आपल्या बड्या बड्या बातांचा हिसका दाखवला. मला जेलमधून बाहेर येऊ द्या. राज्य सरकार खाली खेचले नाही तर बिचुकले नाव लावणार नाही, असेही तो पोलिसांना सांगत होता. त्याच्या या वल्गना सुरू असताना एक पोलिस मान डोलवत त्याला प्रोत्साहन देत होता. त्यामुळे गडी चांगलाच फॉर्मात आला. तू आपला भाऊ आहे, आता फौजदार जरी असला तरी आपले सरकार येताच तुला थेट "डीवायएसपी' करून प्रमोशन देतो, असे सांगत बिचुकले पोलिसांनाही फेकाफेकी करत होता.
निवडणूक लढवायची भारी हौस


कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर अर्ज भरण्यासाठी अभिजितची धडपड सुरू होते. २००९, २०१४,२०१९ या तिन्ही लोकसभा निवडणुकांत स्वत:चा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करत बिचकुलेने निवडणूक लढवली. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत अर्ज दाखल करण्याची त्याची तयारी होती. मात्र, दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघांत अर्ज दाखल करता येत नसल्याने त्याने सातारा आणि सांगलीतून निवडणूक लढवली. सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याने चक्क १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर अनामत रक्कम म्हणून भरली. ही रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. त्याशिवाय त्याची पत्नी अलंकृता आवाडे यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती, पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांना बिनविरोध विधानसभेत पाठवण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे कदम यांच्या विरोधात कुणीही उमेदवारी दाखल केली नाही. मात्र अभिजित बिचुकलेने आपणच भावी आमदार आहोत असे म्हणत उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्य वेळी बिचुकलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगलीतल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्याची विनवणी केली होती. त्याही पलीकडे जाऊन या पठ्ठ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र पाठवून आपली थेट राष्ट्रपतिपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती.


वादग्रस्त पार्श्वभूमी
साताऱ्याच्या गुरुवारपेठेत छोट्याशा घरात राहणाऱ्या अभिजित बिचकुले नगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. मात्र, नियमित कामावर न जाणे, अधिकाऱ्यांनाही बड्या बड्या बाता मारणे, यामुळे सारेच त्याला वैतागले होते. यासंदर्भात त्याला जाब विचारणाऱ्या वरिष्ठांच्या मागेही त्याने चौकशीचा ससेमिरा लावला होता. त्याच्या एका मित्राने सातारा शहरातील केसरकर पेठेत आपल्या नवा कोरा फ्लॅट अभिजितला राहण्यासाठी दिला. मात्र, तो फ्लॅट रिकामा करत नसल्यामुळे त्या मित्रासोबत त्याचे खटके उडाले. ज्या मित्राने फ्लॅट दिला त्याच्याकडून खर्चासाठी हातउसने म्हणून काही रक्कम घेतली होती. ही रक्कम त्याने परत केली नाही. मित्राने तगादा लावल्यानंतर त्याला एक चेक दिला. मात्र, तो चेकही वटला नाही आणि त्याच प्रकरणात आता अभिजितला "बिग बॉस'च्या घरातून उचलण्यात आले.


एकूणच अभिजित बिचुकले हे खऱ्या अर्थाने मनामध्ये प्रश्नांचा गुंता निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व आहे. तो जे बोलतो,जसा वागतो ती त्याची स्वप्नं आहेत की त्याला जडलेला मानसिक आजार आहे? कदाचित आजार नसेल तर स्वप्नरंजन असेल का? स्वप्नरंजन म्हणावं तर तो त्याला कृतीचीही जोड देतोय. मग तो आहे तरी काय? मध्यमवर्गीय आणि गरीब या दोघांचे प्रश्न आणि समस्या वेगळ्या असतात. नोकरीत जरा खालीवर झाले तर आपले काय होईल, असा प्रश्न मध्यमवर्गीय, नोकरदार वर्गाला सतावतो. तर आज काम मिळाले नाही तर संध्याकाळचे काय असा प्रश्न गरिबांना सतावतो. समाजाचे असे एकंदरीत चित्र असताना अभिजित बिचुकले कोणत्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करतो? जेमतेम पगाराची नोकरी होती, आता तीही गेली. घरात पत्नी आणि मुलगा.. त्यांचे काय होईल? हा प्रश्न अभिजितला सतावत नसेल का? की हे प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांसमोरच उभे असतात. काही लोक झोपेत स्वप्न बघतात तर काही लोक जागेपणी स्वप्न बघून स्वप्नपूर्तीसाठी पाठपुरावा करतात. अभिजित बिचुकले मात्र चालता बोलता स्वप्न बघतो आणि दाखवतो. दहा-बारा वर्षांपूर्वी रस्त्यावर फिरून दिसेल त्याला ‘पकवणारा' अभिजित आज ‘सेलिब्रिटी' झाला आहे. त्याची स्वप्न असामान्य आहेत. ती कशी पूर्ण होतील याचा कुठलाही प्लॅन त्याच्याकडे नाही. तरी त्याची महत्वाकांक्षा तसूभरही कमी झाली नाही. मात्र कधी काळी सातारकरांपुरता मर्यादित असलेले हे ‘भावी पंतप्रधान' आता महाराष्ट्राला "बि' कळून "चुकले' आहे. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास कसा असेल हे भलेमोठे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर फेर धरुन नाचते आहे..


लेखकाचा संपर्क : ९८८१७२७४२२

X
COMMENT