Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Krushnur scam; main accused absconded

कृष्णूर घोटाळा : दीड महिना लाेटला; मात्र प्रमुख आरोपी फरार, प्रॉपर्टी जप्तीची पोलिसांची तयारी

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 07:04 AM IST

कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीवर पोलिसांनी १८ जुलैला धाड घालून सार्वजनिक वितरण प्रणालीतील १० ट्रक धान्य पकडले.

 • Krushnur scam; main accused absconded

  नांदेड/परभणी/हिंगोली- कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीवर पोलिसांनी १८ जुलैला धाड घालून सार्वजनिक वितरण प्रणालीतील १० ट्रक धान्य पकडले. त्याला आता जवळपास ४४ दिवस होत आहेत. तथापि अद्यापही या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दुसरीकडे कुंटूर पोलिस ठाण्यात वाहतूक ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी महसूल प्रशासनाने ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई केली नाही. दरम्यान, परभणीतील २८ कोटी रुपयांच्या स्वस्त धान्य धान्य घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन वर्षे उलटली तरी अजूनही तो चौकशीच्याच फेऱ्यात आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन निलंबित झालेले अधिकारी पुन्हा रुजू झाले आहेत.


  कुंटूर येथील इंडिया मेगा कंपनीत होणारा स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार पोलिस कारवाईने उघडकीस आला. तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेत कंपनी व वाहतूक ठेकेदाराविरोधात शासनाची कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. कारवाईची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणाचे सर्व पुरावेही गोळा केले. परंतु अवघ्या आठ दिवसांत त्यांची बदली झाली. तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे दिला. नुरुल हसन यांनीही कोणाच्याही दबावात न येता या प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवला. परंतु अद्यापही या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजय बाहेती, राजू पारसेवार, जयप्रकाश तापडिया यांना अटक करण्यात त्यांना यश आले नाही. केवळ दहा ट्रकचे ड्रायव्हर व रोड ट्रॅक जीपीएस कंंपनीचा एक अशा ११ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली. फरार आरोपींपैकी तापडिया व पारसेवार यांचे अटकपूर्व जामीन अर्जही बिलोली न्यायालयाने फेटाळले आहेत.


  परभणीत २० अधिकाऱ्यांना नोटिसा
  मागील महिन्यात या धान्य घोटाळ्यादरम्यान जिल्हा पुरवठा विभाग व तहसील कार्यालयात कार्यरत तसेच या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या २० अधिकाऱ्यांना त्यांची विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश देणारे पत्र मंत्रालयातून बजावले गेले आहे. जिल्हा पुरवठा विभागांतर्गत असलेल्या धान्य गोदामांची तपासणी १ ते ८ ऑगस्ट २०१६ दरम्यान मुंबईच्या पुरवठा विभागाच्या पथकाने केली होती. त्यात धान्याचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचा ठपका या पथकाने ठेवला होता. साधारणतः ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१६ या दरम्यान धान्याचा अपहार झाला. असल्याचे या पथकाने नमूद केले होते. त्यावरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्या वेळी कार्यरत तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे, तहसीलदार संतोष रुईकर यांच्यासह नायब तहसीलदार चिंतामण पांचाळ, गोदामपाल अनिल आंबेराव व इतर काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. स्वस्त धान्य यंत्रणेतील दुकानदारावरही गुन्हे दाखल झाले होते. पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार ४ कोटी ९७ लाख रुपयांचा हा घोटाळा होता. यामध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिस तपासात हा घोटाळा तब्बल २८ कोटी रुपयांवर पोहोचला होता. काही दुकानदारांना कोतवाली पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे होता. त्यानंतर तो वर्ग होऊन हिंगोलीच्या अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आला.


  निलंबित अधिकारी झाले रुजू...
  धान्य घोटाळ्यादरम्यान कार्यरत असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे, तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार चिंतामण पांचाळ, गोदामपाल अनिल आंबेराव या चौघांना निलंबित करण्यात आले होते. कच्छवे व श्री रुईकर यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले होते. मात्र कच्छवे हे नांदेडमध्ये उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) या पदावर तर तहसीलदार रुईकर हे अंबाजोगाई येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत. तर पांचाळ हे सेवानिवृत्त झाले आहेत.


  कृष्णूर घोटाळ्यातील दहापैकी सात ट्रक हिंगोलीतील
  नांदेड जिल्ह्यात कृष्णूर येथील धान्य घोटाळा प्रकरणात पकडण्यात आलेले दहापैकी सात ट्रक हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता वाहतूकदार चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पुरवठा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात येथील तत्कालीन अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सदर ट्रक जिल्ह्यात आलेच नसल्याचे म्हटले होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नांदेडच्या तपास यंत्रणेला चौकशी करण्यासाठी पत्र पाठवले आहे. त्यानंतर आता नांदेडच्या तपास यंत्रणेकडून हिंगोली जिल्ह्यातील रास्त धान्यांच्या वाहतूक करणाऱ्या वाहतूक दारांची कसून चौकशी केली जाणार आहे. याबाबत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अद्याप चौकशीसंदर्भात पत्र प्राप्त झाले नसले तरी स्वस्त धान्य दुकानदार चांगलेच हादरले आहेत.


  कृष्णूर घोटाळा अन् अधिकारीही तेच
  महसूलमधील अधिकारी हे सातत्याने नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांतच सोयीने सेवा बजावतात. काही अधिकारी तर परभणी व नांदेडमध्येच रमले आहेत. कृष्णूर धान्य घोटाळ्यादरम्यान नांदेड महसूलमध्येच कार्यरत असलेले निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर व उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) दिलीप कच्छवे हे दोघेही परभणीतील धान्य घोटाळ्यादरम्यान परभणीत कार्यरत होते.


  करारही रद्द केला नाही
  धान्याची वाहतूक करणाऱ्या पारसेवार कंपनीसोबत जो शासनाचा करार झाला त्यात जर कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला तर करार रद्द करण्यात येईल, अशी अट आहे. इंडिया मेगा कंपनीतील धाडीनंतर पोलिसांनी वाहतूक ठेकेदाराविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतरही पुरवठा खात्याने त्यांचा करार रद्द करण्याबाबत कारवाई केली नाही. याबाबत महसूल प्रशासन एका शासन अध्यादेशाचा (शासन निर्णय क्र. कंत्राट १०१६ प्र.क्र. १६९ ना.पु. १६ २० एप्रिल २०१७) आधार घेत आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर दीड महिन्यापासून कंत्राटदार फरार आहे. दुसरीकडे धान्याचे वितरण मात्र सुरळीत सुरू आहे. पोलिस यंत्रणा आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच, शासनाच्याच एका अध्यादेशाचा फायदा आरोपीला होत आहे, असे चित्र दिसत आहे.


  ...तर प्राॅपर्टी जप्तीची कारवाई
  या प्रकरणातील फरार आरोपी अजय बाहेती, पारसेवार व तापडिया यांना शोधण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. आमची पथके त्यांचा माग काढत अनेक ठिकाणी जाऊन आली. . परंतु ते वेळोवेळी जागा बदलत आहेत. मोबाइल क्रमांक बदलत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. आता जवळपास दीड महिना होत आला आहे. अजून दोन-तीन दिवसात जर ते स्वत:हून आले नाही तर न्यायालयाच्या आदेशाने त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल. त्यासाठी आम्ही तयारी केली आहे. त्यासंबंधी न्यायालयात रीतसर अर्ज दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी मोक्का अंतर्गतही कारवाई केली जाईल.

  - नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक

Trending