आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभक्त होण्यापुर्वी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाती नाजूक असतात. सामान्य चुका किंवा दुर्लक्षामुळे अंतर वाढत जातं आणि अखेर ते विभक्तपणाचं कारण ठरतं. ही स्थिती वेळीच ओळखता येते. नातं वाचवता येऊ शकतं...

 

लग्नानंतर आयुष्याची नवी सुरुवात होते. या प्रवासात सर्वकाही सुंदर असल्याची अनुभूती येते. मात्र, कालानुरूप या नातेसंबंधातील आपुलकी कमी व्हायला लागते. तुमच्याही नात्यात पहिल्यासारखे नावीन्य राहिले नसेल, नात्यातील बंध सैल झाल्यासारखे वाटत असतील तर नाते जपण्याची हीच वेळ आहे,असे समजा. 


> अंतर निर्माण होण्याची सुरुवात
प्रत्येक नात्यात चढ-उतार येतात, मात्र दोघांपैकी एक जण ‘मी बरोबरच आहे’ या समजुतीत असेल तर अंतर वाढते. वेळीच लक्ष न दिल्यास ही भावना प्रथम नैराश्यात व नंतर विभक्तपणात रूपांतरित होऊ शकते. तुमचा जोडीदार आधीपेक्षा गप्प-गप्प वाटतो, त्याला/ तिला तुमच्या गोष्टीत काहीही देणंघेणं नाही. दोघांतील संवादही कमी झाला असेल तर नाते विस्कटण्याआधी  सावरण्याची वेळ आलीय असं समजा.

काय करावे
दोघांनी मोकळेपणाने बोलावे. संवाद प्रक्रिया सुरू करावी. या संवादात बदललेल्या वागणुकीविषयी विचारणा करा. एखादी तक्रार असेल तर ती माहीत करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरून सरळ उत्तर येत नसेल तर दोन ओळींतील मथितार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. संकेत ओळखा. प्रयत्नाअंती नात्यातील किल्मिष दूर होईल.


> अधिकार गाजवण्याची इच्छा
आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार गाजवण्याच्या, नियंत्रणात ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे नाते ओझे ठरते. तुमचा जोडीदार अकारण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला स्वत:च्या इच्छेनुसार वागवू इच्छित असेल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागत असेल तर असे नाते जास्त काळ तग धरत नाही. नाते वाचवण्यासाठी स्वभावात बदल केले पाहिजेत.


काय करावे?
एखाद्यावर अधिकार गाजवण्यामागचे कारण, इर्ष्या, असुरक्षिततेची भावना असते. तुमचा जोडीदार अशा प्रकारच्या समस्येतून जात असेल तर त्याला/ तिला विश्वास घ्या. त्याच्या/तिच्यासोबत वेळ घालवा. त्याला अशा स्वभावामागचे कारण विचारा. स्पष्ट बोललेले चांगले. विश्वासाच्या पायावर नाते आधारलेले असते आणि संशय, इर्ष्या व असुरक्षा याला कमकुवत करणारी वाळवी आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. 


> टीकात्मक दृष्टीकोन
यात जोडीदार बाहेरच्या लोकांसमोर एकमेकांचे उणेदुणे काढतात. तुमच्यासोबतही अशी समस्या असेल तर वेळीच बदल करा. अशा वागणुकीमुळे नात्यात चीड निर्माण होते.


काय करावे?
जे लोक इतरांवर टीका करतात,त्यांच्या मनात स्वत: चांगले दाखवणे किंवा वरचढ दाखवण्याची इच्छा असते. अशा स्थितीत तुम्ही उत्तर दिल्यास त्याला/तिला धक्का बसेल. त्यामुळे सर्वांसमोर तुम्हाला दोष दिला जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. दुर्लक्ष करणे सर्वात मोठे उत्तर असते. काही काळानंतर समोरचा अशी कृती बंद करेल. जोडीदाराशी एकांतात बोलता येऊ शकते.


> मर्यादांचे उल्लंघन
प्रत्येक नातेसंबंधात काही मर्यादा असतात. त्या कुणीही ओलांडू नयेत. कुटुंबात थोडेफार उल्लंघन नैसर्गिक आहे. मात्र, जोडीदार वारंवार मर्यादेचे उल्लंघन करत असेल तर नात्यातली तेढ वाढते.


काय करावे?
सुरुवातीलाच काही गोष्टी ठरवल्यास आयुष्य सुखकर होते. आवड-निवड, कोणत्याही बाबींची समस्या आहे किंवा कोणत्या गोष्टी करू नये हे माहीत हवे. कोणत्या गोष्टींचा त्रास होतो, कोणत्या गोष्टी चेष्टा-मस्करीच्या परिघात येतात, याबाबत जोडीदाराला सुरुवातीलाच सांगणे चांगले असते. अशा मुद्द्यांमधे  सुरुवातीलाच स्पष्ट शब्दांत रोखणे चांगले.