Home | Sports | Other Sports | Kuldeep, first time in the second rank, Rohit in top-10, Kohli's slide

कुलदीप पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर, रोहित टॉप-10 मध्ये, कोहलीची घसरण 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 12, 2019, 11:51 AM IST

टी-२० क्रमवारी जाहीर : भारतीय संघ दुसऱ्या स्थानी; रोहितची प्रगती 

 • Kuldeep, first time in the second rank, Rohit in top-10, Kohli's slide

  दुबई- यजमान न्यूझीलंड संघाने पाहुण्या टीम इंडियाविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका नुकतीच जिंकली. या मालिकेत भारतीय संघातील युवांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, टीमला आपला मालिका पराभव टाळता आला नाही. याच खेळीमुळे या युवांना आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये मोठी प्रगती साधता आली. यामध्ये टीम इंडियाचा चायनामॅन स्पिनर कुलदीप यादव चमकला. त्याने शेवटच्या टी-२० सामन्यात अव्वल गोलंदाजी केली. त्यामुळे त्याला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारता आली. त्याने करिअरमध्ये पहिल्यांदा दुसरे स्थान गाठले. त्याच्या नावे आता ७२८ गुण झाले आहेत. त्याने या शेवटच्या सामन्यात २६ धावा देत दोन गडी बाद केले. या गटात ७९३ गुणांसह अफगाणिस्तानचा रशीद खान हा अव्वल स्थानावर कायम आहे. दुसरीकडे चहलने १७ वे व भुवनेश्वर कुमारने १८ वे स्थान गाठले.

  टॉप-१० मध्ये ९ फिरकीपटू :

  पाकचा स्पिनर शादाब खान हा तिसऱ्या स्थानी आहे. या टॉप-१० गोलंदाजांमध्ये ९ फिरकीपटू सहभागी झाले आहेत. यात पाकचा एकमेव वेगवान गोलंदाज फहीम अशरफ हा नवव्या स्थानावर आहे. त्याला यात आपले स्थान निश्चित करता आले.

  रहाणे, ऋषभ व शंकर वर्ल्डकपच्या शर्यतीत : प्रसाद
  प्रतिभावंत युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह ऑलराउंडर विजय शंकरला विश्वचषकासाठीच्या संभाव्य संघात सहभागी करण्यात आले. याशिवाय दीर्घकाळापासून वनडे टीममधून बाहेर असलेल्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही यात समावेश आहेे, अशी प्रतिक्रिया निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली.

  रोहितची तीन स्थानांनी प्रगती
  भारताच्या प्रभारी कर्णधार रोहित शर्माला या क्रमवारीमध्ये मोठी सुधारणा करता आली. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी प्रगती साधली. त्याने ६९८ गुणांसह सातवे स्थान गाठले. या गटात पाकचा बाबर आझम हा अव्वल आणि न्यूझीलंडचा कोलिन मुन्रो हा दुसऱ्या स्थानावर आहे. कोलिनने भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत ११८ धावा काढल्या. तसेच लोकेश राहुलची क्रमवारीत घसरण झाली. तो आता दहाव्या स्थानावर आला. शिखर धवन हा ११ व्या स्थानावर आहे. त्यालाही क्रमवारीत स्थान कायम ठेवता आले.

  धोनीवर आयसीसीची खास कविता
  आयसीसी आता कुशल प्रशासनासह खेळाडूंच्या कामगिरीवरही शब्दसुमनांचा वर्षाव करत आहे. यातूनच आयसीसीने जगातील सर्वात यशस्वी ठरलेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर कविता केली. इंग्रजीचे कवी जॉन लिनन यांच्या 'इमॅजिन' याच कवितेच्या शब्दावर आधारित आयसीसीने धोनीसाठी कविता केली. 'विचार करा, जर धोनी नसता तर काय झाले असते. अशी कल्पनाच करवत नाही. तेव्हा आव्हानात्मक झेल आणि स्टम्प नसते. काही विशेष गोष्टी कानावर पडल्या नसत्या. प्रत्येक फलंदाज २ वा ३ धावांसाठी पळत राहिला असता,'अशी कविता करण्यात आली. आयसीसीने धोनीला ३०० टी-२० सामने खेळल्याबद्दल खास शुभेच्छा दिल्या. यात धोनीने ९६ सामने भारतासाठी खेळले आहेत.

  विराट कोहली आहे ८ पैकी ४ टी-२० मालिकेतून बाहेर
  आगामी वर्ल्डकपच्या तयारीसाठी विश्रांती घेतल्यामुळे कोहलीला नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत सहभागी होता आले नाही. त्याचा त्याला जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा फटका बसला. त्याची १९ व्या स्थानावर घसरण झाली. त्याला आठपैकी चार टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली. त्यामुळेच त्याला नुुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही सहभागी होता आले नाही.

Trending