आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयागराजमध्ये धर्मध्वजा; कुंभमेळ्याचे सहा लाख गावे, 192 देशांना निमंत्रण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज/लखनऊ- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मकरसंक्रांतीपासून प्रारंभ हाेत असलेल्या कुंभमेळ्याची तयारी पूर्णत्वास आली असून त्यासाठी गंगा-यमुना-सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर साकारल्या जाणाऱ्या कुंभनगरीरूपी 'लघु भारत'मध्ये संपूर्ण जगाने सहभागी व्हावे, असे उत्तर प्रदेश सरकारचे नियाेजन आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी यूपी सरकारतर्फे देशातील सर्व सहा लाखांपेक्षा जास्त गावांच्या प्रतिनिधींना रीतसर पत्रे पाठवून कुंभमेळ्यात येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. गावागावापर्यंत हे निमंत्रण पाेहाेचावे म्हणून सरकारच्या अधिकाऱ्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. राज्याच्या प्रत्येक गावातील कमीत कमी चार जणांना या भव्य-दिव्य महाेत्सवात पाठवण्याची व्यवस्था करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मुख्य सचिव हे निमंत्रण त्यांच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींच्या सरपंचांपर्यंत पाेहाेचवत आहेत. यासाठी स्वत: मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ हेदेखील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून निमंत्रण देत आहेत. या कुंभमेळ्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक सहभागी व्हावे म्हणून १९२ देशांना तेथील दूतावासांच्या माध्यमातून येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे.

 

विदेशातील शहरांत राेड शाे 
केंद्र सरकारतर्फे जगातील माेठ्या शहरांत या कुंभमेळ्याच्या प्रचारासाठी राेड शाेदेखील आयाेजित केले जात आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये २०१६ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळीही अशा प्रकारे प्रचार केला हाेता. मेळ्यात देशोदेशींचे पर्यटक सहभागी झाले. 

 

अनुष्ठानाने धर्मध्वजेची स्थापना 
पंचायती माेठ्या उदासीन आखाड्याच्या धर्मध्वजेची स्थापना विशेष पूजा करून झाली. या ध्वजेत वरच्या बाजूला माेरपंख, एका बाजूला हाताचा पंजा व दुसऱ्या बाजूला बजरंगबलीचे छायाचित्र आहे. या धर्मध्वजेचे रक्षण नागा साधू-संन्यासी करतील. 

 

वासुदेवानंद सरस्वतींची पेशवाई 
या वेळी स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या पुढाकारात मंगळवारी शंकराचार्य आश्रमापासून पेशवाई काढण्यात आली. त्यात काशी सुमेरू पीठाधीश्वर स्वामी नरेंद्रानंद सरस्वतींसह विविध रथांमधून साधू-संत सहभागी झाले हाेते.
 

बातम्या आणखी आहेत...