Magazine / पुरस्कार, साहित्य व्यवहार, सामाजिक भूमिका वैग्रे...

आपलं म्हणणं रोखठोकपणे मांडून त्यासाठीची किंमत चुकवण्याची धमक आमच्या "कथित' नवोदित पिढीत आहे का?

कुणाल गायकवाड

Jul 21,2019 12:20:00 AM IST

आपल्या अभिव्यक्तीच्या प्रामाणिक सर्जनशील प्रक्रीयेपेक्षा आपल्याला लेखक किंवा कवी म्हणून लवकर ‘प्रस्थापित’ व्हायचं आहे... इथेच खरी गोम आहे. बरं हे प्रस्थापित होणं, यात काही गैर नाहीये. पण यासाठी आपण कोणत्या तडजोडी करतोय? आपलं म्हणणं रोखठोकपणे मांडून त्यासाठीची किंमत चुकवण्याची धमक आमच्या "कथित' नवोदित पिढीत आहे का? याला चार दोन अपवादही असतील. परंतु साहित्य व्यवहार आणि पुरस्कारांचं मार्केट आम्हाला नेमकं चांगलं लिखाण करण्यासाठी उत्तेजना देत आहे की, गटा-तटांचे टाळकरी होण्यासाठी देत आहे, याचं आत्मपरिक्षण कोण करणार आहे?


मराठी साहित्याचं "चांगभलं' झालं पाहिजे यात दुमत नाहीये. पण हे अपेक्षित चांगभलं होण्यासाठी आपण फक्त प्रस्थापित साहित्य व्यवहार हातात असणाऱ्या शक्तीस्थळांचे गोंधळी होऊन नुसतंच उदो उदो करतोय का? हा प्रश्न सर्वच चांगलं लेखन करण्याची शक्यता असणाऱ्या नवोदितांनी स्वत:ला विचारला पाहिजे. स्वत:च्या अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहून सर्जनशील प्रक्रियेचा प्रवास समाजावून घेण्यापेक्षा साहित्य व्यवहारालाचं अधिक महत्व नेमकं कशासाठी द्यायचं आहे. आपापल्या मनातील आंदोलनापेक्षा नेहमीच पॉलिटिकली करेक्ट राहून ‘हा ही चांगला, तो ही चांगला’ म्हणत या शक्तीस्थळांची मान्यता मिळवण्यात केलेल्या धडपडीतून आपल्यातला कवी किंवा लेखक जिंवत तरी कसा राहू शकतो...?


आपल्या अभिव्यक्तीच्या प्रामाणिक सर्जनशील प्रक्रीयेपेक्षा आपल्याला लेखक किंवा कवी म्हणून लवकर ‘प्रस्थापित’ व्हायचं आहे... इथेच खरी गोम आहे. बरं हे प्रस्थापित होणं, यात काही गैर नाहीये. पण यासाठी आपण कोणत्या तडजोडी करतोय? आपलं म्हणणं रोखठोकपणे मांडून त्यासाठीची किंमत चुकवण्याची धमक आमच्या "कथित' नवोदित पिढीत आहे का? याला चार दोन अपवादही असतील. परंतु साहित्य व्यवहार आणि पुरस्कारांचं मार्केट आम्हाला नेमकं चांगलं लिखाण करण्यासाठी उत्तेजना देत आहे की, गटा-तटांचे टाळकरी होण्यासाठी देत आहे, याचं आत्मपरिक्षण कोण करणार आहे?


आपल्या आधीच्या पिढ्यांनी काही बंडखोरी करून आशयविषयांचे स्तर उंचावले आहेत. लिटील मॅगझीन चळवळीतून निर्माण झालेले आणि आज मोठ्या असलेल्या साहित्यिकांनी आपल्या आधीच्या साहित्यिक अभिव्यक्तीला प्रखर प्रश्न विचारले. फॉर्म ते भाषा यात प्रयोग करून मुठभरांच्या नियंत्रित साहित्यव्यवहाराला फाट्यावर मारले. एवढ्यावरचं न थांबता अनेक उत्तम कलाकृती निर्माण केल्या. या पिढीचा आमच्यावर प्रभावही होता आणि यातून आमचे भरणपोषणही झाले. अशा पद्धतीची रचनात्मक बंडखोरी आमच्या पिढीत आहे का? उलट आम्ही मात्र आमच्या आधीच्या पिढ्यांना डोक्यावर घेऊन त्यांचे देव केले आहेत. आम्ही भक्तही झालो आहोत. आता फक्त या मोठ्या साहित्यिकांचे मंदीरं बांधली की, आम्ही आराधी-भगतं आरत्या गाण्यासाठी मोकळे होणार. कदाचित या प्रक्रियेतून कुणी सुटला, त्याने काही प्रश्न विचारले, काही नाकारलं तर त्याची कशा पद्धतीनं नाकेबंदी केली जाते? त्याला कशा पद्धतीनं दुर्लक्षीत केलं जातं? कधी कधी तर अशा एखाद्याला भाकरीलाही मोहताज केलं जातं... आणि हे सर्वश्रूत आहे.


ही लवकर वाहवा आणि हारतुरे मिळवण्याची धडपड आपल्या स्वातंत्र्यालाच बंदीस्त करून ठेवतेय. बरं ज्या साहित्य व्यवहारात स्थान मिळवण्यासाठी आपण जे एकमेकांचे कौतुक सोहळे चालवले आहेत, त्याचा परिघ आहे तरी किती? मराठीतील कवींचे किती काव्यसंग्रह विकले जातात, इथपासून तर त्याला मिळणाऱ्या पुरस्कारांच्या स्वरूपातलं आणि रॉयल्टीतील मानधन तरी किती असतं? या साहित्यात व्यवहाराच्या नावाखाली चाललेला निव्वळ लोकव्यवहार किंवा ज्याला ‘पब्लिक रिलेशन’ असा गोंडसरित्या म्हणतो, यामुळे तुमच्या आमच्यासारख्या नवोदितांचे असे कोणते भौतिक प्रश्न सुटतात. बाकी कला वगैरे हा तर लांबचाच मुद्दा. अशा पद्धतीचं प्रस्थापित साहित्यिकांशी पब्लिक रिलेशन करून, भेटेल त्याच्यासोबत फोटो टाकून, ओढून-ताणून संबंध जुळवून उमेदवारीचं जाहीर प्रदर्शनही करणंही किळसवाणं आहे. यात ना साहित्याविषयी आस्था आहे, ना आशय-विषय-कला-फॉर्म याविषयी चर्चा आहे, नुसता उदो उदो...


बरं, हे तर पुरस्कार पदरात पाडून घेणाऱ्या नवोदितांविषयी झालं, पण जे नेहमी साहित्य वलयात राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि साहित्यिकांनी राजकीय भूमिका घेतल्या पाहिजेत, साहित्यात तुमचं राजकीय भान दिसलं पाहिजे, अशा नेहमीच निषेधाच्या पाट्या मिरवत असतात, अशा धूळफेकी चळवळ्या नवोदित उमेदवार कवी-लेखकांचं नेमकं साहित्यविषयक काय भान आहे? हे ही तपासयला नको का?

इथेच एक मुद्दा स्पष्ट करायला हवा, कवीला राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांवर मते असतात, असली पाहिजेत. सामाजिक न्यायाची, सामाजिक बदलाची आदर्शवादी, आशावादी, अपेक्षा किंवा एक आदर्श समाजाची अपेक्षा व्यक्त करणं हे क्रमप्राप्त असतंही. कधी विषमतेवर प्रहार करत आपापल्या अभिव्यक्तीच्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार आक्रोश आणि विद्रोहही करणं क्रमप्राप्त असतंच. पण हे सर्व करत असताना, तो जर कवी म्हणून हे करत असेल तरच... कविता हा फॉर्म म्हणून, कविता अभिव्यक्तीचा एक विशिष्ट प्रकार आहे, त्याच्या काही कविता म्हणूनचं बलस्थानं आहेत. त्याचाही विचार करणं आवश्यक असतंच. सगळ्या कथित राजकीय-सामाजिक भूमिका कविता लिखाणातून अतिशय जाणिवपूर्वक घुसडण्यात येत असतील तर तो बनचुकेपणा आहे. ठरवून कवितेत पाणी ओतत राहणं, गणित सोडवल्यासारखी कविता लिहणं, किंवा सरळ एखाद्या महान कवीची झेरॉक्स मारत राहणं, हा शुद्ध दांभिक आणि भंपकपणा आहे. कुण्या महान कवीचा प्रभाव पडणं ही स्वाभाविक बाब आहे, कुण्या एखाद्या परंपरेचे पाईक आहोत, असं सांगत राहणंही मान्य आहे, पण कविता म्हणून लिहिण्याऱ्याचं स्वत:च स्वत्व, त्याच्या समकाळातली भाषा, त्याच्या समकाळातील तपशील, मुल्यव्यवस्थेवरचं बरवाईट भाष्य यायला हवं. विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा जर कुणी कवितेच्या माध्यमातून करतोय आणि कृतीच्या व जगण्याच्या पातळीवर मर्यांदांमधून जात असेल तर, त्याच्या अभिव्यक्तीला काय म्हणणार? अनुभवांशी प्रामाणिक असण्यापेक्षा अभिव्यक्तीला वाकवणं सोपं असतं. एकवेळेस अतिशय तोकडा अनुभव असेल, अतिशय तोकडं अनुभवविश्व असेल, पण तो अतिशय उत्कटपणे मांडणं जास्त महत्वाचं नाही काय? एखादा क्रियावंत म्हणून सामाजिक हस्तक्षेप करत राहणं आणि त्याची अभिव्यक्ती कवितेच्या किंवा गद्याच्या फॉर्ममधून परिवर्तनवादी आशय मांडत राहणं, हे एकाचवेळी शक्य आहे का? जगाच्या पातळीवर असे क्रियांवत आणि कवी होऊन गेले, अाहेतही. त्यांच्या कवितेशी नातं सांगताना, त्यांचा प्रभाव आहे, असं सांगताना, आपण फक्त त्यांच्या कवितेचा प्रभाव आहे असंच सांगत असतो. कृती आणि सामाजिक हस्तक्षेपाच्या पातळीवर आपण शुन्य असलो तर आपली कविता कशी काय परिवर्तनवादी होऊ शकते? आपल्या अपेक्षा आणि आपल्या मर्यांदा तपासून घ्यायला नकोत का?


हे तपासत असताना, आपण राजकीय-सामाजिक घटीतांचे आकलन कसे करतो, त्याला कोणत्या दृष्टीने पाहतो, त्यावर आपले चिंतन होते का आणि उत्स्फूर्तपणे कवितेच्या उपलब्ध किंवा नवीन निर्माण होऊ पाहणाऱ्या फॉर्ममध्ये काही सांगू शकतो, या अशा स्वरूपाच्या भावअवस्थेत राजकीय-सामाजिक विषयावर कवितेत भाष्य येते. घटीतांचे,तपशीलांचे संदर्भ येतात किंवा एखादी प्रतिकव्यवस्था म्हणूनही ते कवितेत उमटतात. तेंव्हा कवी आपल्या पातळ्यांवर, मर्यांदा आणि क्षमता विकसीत करत काहीतरी राजकीय भाष्य करू पाहण्याच्या प्रक्रीयेत आला आहे, असे म्हणता येईल. पण त्याचा काही परिणाम होतो का? ती कविता राजकीय भाष्य म्हणून साहित्य व्यवहारातून वाचकांना काय देते, तिची परिणामकारकता किती आहे, ती तपासायची कशी हे माहित नाही.


खऱ्याखुऱ्या सक्रीय राजकारणात अनेक कवींच्या कविता राजकीय आर्ग्युमेंट म्हणून सर्वसामान्य लोक ते राजकीय पुढारीही वापरत असतात. काही कविता सामाजिक चळवळींचे गाणे म्हणून प्रेरणा निर्माण करतात. अशा पद्धतीचं काव्य आणि त्याला लोकमान्यता मिळणं, हे कवीच्या क्षमतेवर अवलंबून असतं. कवीचं जगणं, त्याची निष्ठा आणि काव्य एकरूप असेल तर तो माणूस म्हणून मोठा होतो, त्याचं कवी असणं समाज ग्लोरिफाय करतो, त्याचं मिथकही बनतं. पण हे सर्वांसोबत होतं का? मी ज्या काळाच्या, व्यक्तीगत आयुष्यातील संघर्षाच्या, राजकीय-सामाजिक परिस्थितीच्या विशिष्ट स्थानावर उभा आहे, त्या स्थानावरून ते शक्य आहे का? त्याला माझ्या काही मर्यादा आहेत का? किंवा अशा राजकीय भूमिका घेत मी कवितेला एक टूल म्हणून वापरत ‘भूमिका भूमिका भूमिका' असं बोंबा मारत सुटणं याला काही अर्थ आहे का? या भूमिकेच्या अट्टाहासापायी मुळं ‘कविता' या प्रकाराविषयीची आपली समज आपण खुडून टाकतोय का? हे मी स्वत:ही तपासून पाहिलं पाहिजे. मोठ्या सामाजिक आणि राजकीय पटलावर मराठी साहित्यविश्वात निर्माण होणाऱ्या कलाकृतीनी वाचकांच्या मनावर भूमिका घेण्यासाठी काही छाप सोडली आहे का? असेल तर त्याचा काहीतरी सामाजिक आणि राजकीय पटलावर परिणाम दिसतो का? मुळात ही प्रक्रीया खुप लेन्दी असते. विशिष्ट कालखंडातील कला, समाजाच्या मानसशास्त्रीय जडणघडणीत किती उत्प्रेरक म्हणून काम करते हे तपासता येतं. दलित चळवळ आणि दलित साहित्य जसं एक सामाजिक- राजकीय- साहित्यिक प्रक्रिया म्हणून समजून घ्याव लागतं. तसेच माझ्या समकाळातील अभिव्यक्ती, कलाप्रकार, कविता ही अनेक विकसीत होऊ पाहणाऱ्या माध्यमातून प्रसवत समाजाच्या/ वाचक घटकाच्या राजकीय-सामाजिक भूमिकेला जर मोल्ड करण्यासाठी महत्वाची ठरत असेल तर कवितेमागची "कथीत राजकीय सामाजिक परिवर्तनाची भूमिका' या सर्व किचकट प्रक्रीयांमधून समजून घ्यावी लागते. उगाच "तुमच्या कवितेची भूमिका काय' आहे. किंवा "कविता लिहण्यामागे काय भूमिका आहे' अशा वृत्तपत्रीय उथळ मुलाखतीकारासारख्या संवगरितीने विचारलेल्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो.


सामाजिक न्यायाच्या संदर्भानं, सांस्कृतिक प्रभूत्वाच्या संदर्भानं, धर्माधिष्ठीत शोषणाच्या विविधअंगी प्रारूपाच्या संदर्भानं विचार करत असताना, याच क्लिष्ट समाजव्यवस्थेत मला जे काही जाणवतं, ज्यावर माझं चिंतन होतं,त्या संरजामी, जातीयवादी घटीतांवर भाष्य करणं अपेक्षितच आहे. या सगळ्या किचकट आणि विरोधाभासी परिस्थितीवर माझ्या अनुभवविश्वाच्या, माझ्या भाषेच्या आणि जाणिवांच्या विशिष्ट अभिव्यक्तीतून मी जे काही कविता म्हणून लिहतोय त्यात माझी एक समग्र भूमिका उमटलेली असते. एखाद्या कविता किंवा कवितेतील एखाद्या ओळीचा तुकडा राजकीय तपशील किंवा घटीतावर बेतलेला असेल त्याला कवीची राजकीय भूमिका म्हणून पाहायचे का? तर ते एवढं सोप प्रकरण नाही. मी कवितेचा फॉर्म कोणता वापरतो, त्यात भाषिक मोडतोड कोणती आणि कोणत्या परंपरेचा प्रभाव घेऊन करतो, त्यातली प्रतिक व्यवस्था काय आहे..? कवितेत येणारी मिथकं या सगळ्यांचं जाणिव नेणिवेतून उत्फूर्तपणे जी काही कविता जन्माला आलेली असते, तीचं स्थान किंवा पोजीशनिंग एका मोठ्या सांस्कृतिक राजकारणाच्या कोणत्या तरी नरेशनच्या स्ट्रीममध्ये आपसूक होतचं असते. कलेच्या किंवा साहित्याच्या माध्यमातून काळानुरूप विकसित-उत्क्रांत होत आलेल्या वेगवेगळ्या भूसांस्कृतिक घटकातील समाजाचे अस्थेटिक, नरेशन या कवितेचं स्थान अंकीत होतंच असतं. तुमची कविता-लेखन कोणत्याही पोजिशनवर असू देत, तिचं स्थानं हे आपसूक एका राजकारणाचाचं भाग असते. त्या स्थानावरूनच तुमच्या कवितेतील समग्र भूमिका दिसत असते. ते स्थानचं तुमची भूमिका असते.

कुणाल गायकवाड
kunal.g[email protected]

लेखकाचा संपर्क - ९२८४२६८९०४

X
COMMENT