आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार विभागाची एनआेसी असल्याशिवाय आता नवीन बांधकामांना परवानगी नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील काेंढवा व आंबेगावात संरक्षक भिंत काेसळून २१ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर  कामगार आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. काेणत्याही नवीन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यापूर्वी संबंधितांनी कामगार विभागाची एनआेसी घेणे बंधनकारक असल्याचे सांगत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे. 


भेगडे म्हणाले, काेंढवा दुर्घटनाप्रकरणी ६ जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाईल.  पुणे पालिकेच्या वतीने मागील ३ दिवसांत धाेकादायक स्थितीत असलेल्या २८७ इमारतींची पाहणी करण्यात आली असून ६ हजार झाेपडपट्टयांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. टेकडी, दरड काेसळण्याची ठिकाणे, माेडकळीला आलेल्या इमारती यांचे प्राधान्याने सर्वेक्षण करून त्याबाबतच्या उपाययाेजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत आपत्तीत काळात एकत्रित काम करावे असे सूचित केले आहे. धाेकादायक इमारती, संरक्षक भिंतीची माहिती नागरिकांकडून मिळण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.


बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई संस्थेच्या सदस्यांना त्यांच्या बांधकाम ठिकाणी लेबरकॅम्पची सुरक्षा पडताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वेळी पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी २ दिवसांत ८० धाेकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली असून त्यापैकी ६० जणांना नाेटीस देण्यात आल्याचे सांगितले, तर १० ठिकाणच्या लाेकांना स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, आंबेगाव दुर्घटनेच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मजुरांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. 


कामगारांची आॅनलाइन नाेंदणी करणार
बांधकाम साइटवर ९० दिवसांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कामगारांची विकासकाने कामगार विभागाकडे नाेंदणी करून पिवळ्या रंगाचे कार्ड देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा छाेटे-माेठे व्यावसायिक त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. यापुढे अशा कामगारांची आॅनलाइन नाेंदणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...