आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीत समन्वयाचा अभाव; वडेट्टीवार यांच्या बंगल्यातून फोन, राष्ट्रवादीने गुंडाळला जाहीरनामा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - विधानसभा निवडणुकीसाठी बनवलेला जाहीरनामा गुंडाळून ठेवण्याची मोठी नामुष्की सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली. जाहीरनामा प्रसिद्धीसाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाशनाला फाटा देत फक्त थातूरमातूर विषय मांडून जाहीरनामा समितीला वेळ मारून न्यावी लागली. काँग्रेसने संयुक्त जाहीरनाम्यासाठी दबाव टाकल्यामुळे राष्ट्रवादीवर ही वेळ आली. त्यामुळे पत्रकार परिषदेत देण्यासाठी आणलेले जाहीरनाम्याच्या प्रतीचे गठ्ठे पक्षनेत्यांना वाटप न करताच परत न्यावे लागले. दरम्यान, आता मंगळवारी दोन्ही काँग्रेसचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात आधी जाहीरनामा तयार करून राष्ट्रवादीने आघाडी घेतली हाेती. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साेमवारी त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रमही ठेवला हाेता. त्यासाठी जाहीरनामा समितीचे सदस्य उपस्थित होते. दुसरीकडे काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मंत्रालयाशेजारील बंगल्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक चालू होती. त्यात काँग्रेसने राष्ट्रवादीच्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमावर आक्षेप घेतला.
 

आता संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करणार
१ राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, भाकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, रिपाइंचे विविध गट असा संयुक्त जाहीरनामा आता प्रकाशित हाेईल.
२ खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जाहीरनामा बनवला आहे. त्यात हवामान बदल आणि राज्याचा शाश्वत विकास हा मुख्य केंद्रबिंदू आहे.

३ राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे संयुक्त जाहीरनाम्यात येतील. मात्र आताचा आमचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करणार नाही, असे  वंदना चव्हाण म्हणाल्या.
 

काँग्रेसचा आक्षेप :
‘तुम्ही स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केल्यास त्यातून वेगळा अर्थ निघेल. दाेन्ही पक्ष स्वतंत्र लढणार काय, असे तर्कवितर्क काढले जातील. म्हणून आघाडीचा एकच जाहीरनामा हवा,’ असे मत काँग्रेसचे बाळसाहेब थाेरात व पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनीही सहमती दर्शवली. पटेल यांनी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना फोन लावला आणि जाहीरनामा प्रसिद्ध करू नका, असे आदेश दिले. त्यामुळे मलिक यांना माघार घ्यावी लागली.
 

प्रकाशनासाठी पुढाकार घेणाऱ्या मलिक यांची गाेची 
३ महिन्यांत २० बैठकांनंतर राष्ट्रवादीचा जाहीरनामा बनला. मात्र, ऐनवेळी वडेट्टीवार यांच्या बंगल्यातून फोन आला अन् प्रकाशन रद्द करण्यात आले. ‘तुमची आघाडी होणार होती, मग, तुम्ही स्वतंत्र जाहीरनामा का बनवलात?’ असा प्रश्न विचारून पत्रकारांनी मलिक यांना भंडावून सोडले. त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते.
 

दुसऱ्याची घरे फोडून पवारांनी काय मिळवले : क्षीरसागर
बीड  | ‘१५ वर्षांत काय केलं’ हे आज तुम्ही विचारता. जेव्हा जवळ होतो तेव्हा का नाही विचारले? बीडमध्ये येऊन उमेदवारी घोषित करावी लागली आणि चूकही कबूल करावी लागली हे कशाचे प्रतीक आहे. दुसऱ्याची घरे फोडून काय मिळवले,’ असा सवाल शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता विचारला.