आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lack Of Grounds In Osmanabad, Meetings In Girls' School Premises, Time To Cut Walls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभा घ्यायच्या कुठे, उस्मानाबादेत मैदानांचा अभाव, कन्या शाळेच्या प्रांगणात सभा, भिंत पाडण्याची वेळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रसेन देशमुख

उस्मानाबाद - उस्मानाबादेत राजकीय किंवा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठे मैदानच उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या मराठी कन्या शाळेच्या मैदानाचा वापर होत आहे. मात्र, मैदानावर गर्दी झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षक भिंत पाडावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या सभेसाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी आणि त्यानंतर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी ही भिंत पाडावी लागली.

शहरात पुष्पक मंगल कार्यालयाच्या परिसरात मोकळ्या जागेमध्ये अनेक वर्षे राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या. अलीकडच्या काळात या मोकळ्या जागेवर बांधकामे झाली अाहेत. त्यापूर्वी जिल्हा क्रीडा संकुलावर सभा होत होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर या संकुलाचा वापर केवळ क्रीडा स्पर्धेशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी केला जात नाही. त्यामुळे शहरात मोठ्या सभा घेण्यासाठी जागाच उरलेली नाही. मंगल कार्यालयांमध्ये सभा घेण्यावर मर्यादा येत असल्याने बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा मध्यवर्ती भाग असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी कन्या शाळेच्या प्रांगणात घेतल्या जात आहेत. सोमवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर संरक्षक भिंत पाडल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे सभा घ्यायच्या कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक, या मैदानावर ये-जा करण्यासाठी एकच रस्ता असून, तोही अपुरा असल्याने व नेत्यांच्या गाड्या आत आणण्यासाठी लेडीज क्लबजवळ संरक्षक भिंत पाडण्यात आली होती. ही भिंत सभेचे आयोजक बांधून देणार आहेत. यापूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची सभा झाली तेव्हा देखील ही भिंत पाडण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी भिंत पाडण्यात आली होती. त्यानंतर संयोजकांनी भिंत बांधून दिली होती. ठाकरेंच्या सभेनंतर ही भिंत बांधून देण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.
 

२५ फुटांच्या भिंतीसाठी १० हजारांचा खर्च
मराठी कन्या शाळेच्या प्रांगणावरील सभेला संबोधित करण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना आत जाण्यासाठी साधारण २५ फूट आडवी संरक्षक भिंत पाडली जाते. ही भिंत बांधण्यासाठी अंदाजे १० हजार रुपये खर्च होतो. आतापर्यंत तीन वेळा ही भिंत पाडण्यात आली.