Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Lady 'SINGHAM' Ujjwala Gadekar raids on bulle

'लेडी सिंघम' उज्ज्वला गाडेकर यांनी बुलेटवर स्वार होत टाकले छापे

प्रतिनिधी | Update - Sep 13, 2018, 12:10 PM IST

प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी दुपारी बुलेटवर स्वार होत वाळूसाठ्यावर छापा टाकला.

 • Lady 'SINGHAM' Ujjwala Gadekar raids on bulle

  नगर- प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी दुपारी बुलेटवर स्वार होत वाळूसाठ्यावर छापा टाकला. नगरजवळील नांदगाव शिंगवे, केके रंेज परिसरात सुमारे ५० ब्रासचा वाळूचा साठा आढळून आला. हा साठा महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत कारवाई सुरू केली. प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईची चर्चा सुरू आहे.


  जिल्ह्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अधिकाऱ्यांवर नजर ठेवत व नजराणा देत तस्करी करत होते. लिलावात भाग न घेता वाळूतस्कर चोरीच्या वाळूला पसंती देत मालामाल होत अाहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाळूतस्कर आणि बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. नगरच्या प्रांताधिकारी गाडेकर यांनी मंगळवारी साडेबाराच्या सुमारास नांदगावात कारवाई केली. वाळूतस्करांचा 'वॉच' चुकवत गाडेकर यांनी कारवाई केल्याने मोठा साठा महसूलच्या हाती लागला. जवळच्याच नदीतून बेकायदा उत्खनन करून ही वाळू विक्रीसाठी आणल्याचे कारवाईत पुढे आले.


  जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांकडे या परिसरात होत असलेल्या वाळू वाहतुकीसंदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, वाळूतस्करांचा वॉच चुकवत कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे प्रांताधिकारी गाडेकर यांनी बुलेटवर स्वार होत नांदगाव शिंगवे गाठले. तेथून त्यांनी आपल्या पथकातील कर्मचारी अशोक मासाळ, अमोल येमूल, कामगार तलाठी भाऊसाहेब शिंदे, मंडलाधिकारी रावसाहेब आव्हाड, भाऊसाहेब बर्डे आदींना बोलावून घेतले. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी वाहनाद्वारे जाण्यासाठी अतिशय बिकट असलेल्या नांदगाव, सजलपूर व केके रंेज परिसरात बुलेटवर जात छापे टाकले. पन्नासहून अधिक ब्रासचे वाळू जप्त करण्यात आली. या लेडी सिंघमला बघून वाळूतस्करांची धावपळ उडाली. यापूर्वी संगमनेरमध्ये तत्कालीन प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी वाळूतस्करांवर कारवाईचे अस्र उपसत मोठ्या प्रमाणात तस्करांना लक्ष्य केले होते. त्यामुळे आंबेकर वाहनातून रस्त्याने जरी कोठे जात असल्याचे दिसले, तरी त्या मार्गावरील वाळूतस्कर वाहने लपवत तेथून पळ काढत असत. त्यांचीच री आेढत गाडेकर यांनी ही कारवाई केल्याने या लेडी सिंघमची जिल्ह्यातील वाळूतस्करांत चर्चा सुरू आहे.


  वाळूचोरांविरोधात कारवाई सुरूच राहणार
  जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बेकायदा वाळू आणि गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. वाळूतस्करीवर कारवाईसाठी पथके लक्ष ठेवून आहेत. माहिती मिळताच अन्य ठिकाणी कारवाई केली जाईल.
  - उज्ज्वला गाडेकर, प्रांताधिकारी.

Trending