आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकसभेला मते घटली; काँग्रेसने कापली चाैघांची उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : जळगाव जिल्ह्यात १९८४ च्या लाेकसभा निवडणुकीत काँग्रेस (आय) पक्षाला ज्या विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाली त्या मतदारसंघातील तत्कालीन आमदार प्रतिभाताई पाटील, सुरेश जैन यांच्यासह चार जणांची उमेदवारी १९८५ च्या निवडणुकीत पक्षाने कापली हाेती. दुसरीकडे, या जिल्ह्यात शरद पवार यांच्या एस काँग्रेसची पाळेमुळे राेवणाऱ्या मु. ग. पवार यांना विधान परिषद, तर प्रल्हादराव पाटील यांना थेट राज्य बँकेचे अध्यक्षपद देण्यात आले हाेते.

सन १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वात पुलाेद विरुद्ध काँग्रेस (आय) अशी लढत झाली हाेती. त्यापूर्वी सन १९८४ मध्ये एरंडाेल लाेकसभा मतदारसंघातून विजय नवल पाटील आणि ब्रिजलाल पाटील यांच्यात लढत झाली. यात काँग्रेसचे (आय) विजय पाटील विजयी झाले, तर जळगाव मतदारसंघात प्रल्हादराव पाटील यांचा पराभव करत काँग्रेसचेच (आय) वाय. एस. महाजन विजयी झाले हाेते. परंतु काँग्रेसच्या या दाेन्ही विजयी उमेदवारांना काही विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाली. याच कारणावरून काँग्रेसने मुक्ताईनगरमधून पाच टर्म आमदार राहिलेल्या प्रतिभाताई पाटील यांची विधानसभेची उमेदवारी कापून त्यांच्याएेवजी रमाकांत चाैधरी यांना तिकीट दिले. मात्र, या निवडणुकीत चाैधरींचा पराभव झाला हाेता, तर रावेरमधून तत्कालीन आमदार आर. आर. पाटील यांचे तिकीट कापून मीराबाई तडवींना, भुसावळमध्ये हाजी बागवान यांच्याएेवजी अख्तरअली काझी यांना उमेदवारी देण्यात आली हाेती. जळगावात सुरेश जैन यांचेही तिकीट कापले. मात्र, जैन यांचा प्रभाव माेठा असल्यामुळे शरद पवारांच्या एस. काँग्रेसने सुरेश जैन यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत जळगावातून सुरेश जैन, चाेपड्यात अरुण गुजराथी, पाराे‌ळ्यातून अॅड. वसंतराव माेरे, मुक्ताईनगरमधून हरिभाऊ जवरे, चाळीसगावमधून वासुदेव चांगरे हे एस. काँग्रेसचे पाच जण आले हाेते. या कामाची पावती म्हणून शरद पवारांनी मु. ग. पवार यांना विधान परिषदेवर आमदार केले, तर प्रल्हादराव पाटील यांना राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद दिले हाेते. पवार व पाटील हे दाेन्ही नेते आज हयात नाहीत. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आयचे के. डी. पाटील यांचा पराभव करून काँग्रेस एसचे देविदास भाेळे हे निवडून आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एस काँग्रेसचे सर्वाधिक ७ आमदार हाेते.

एस काँग्रेसच्या उदयानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी
१९८५ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिभाताई पाटील, सुरेश जैनांसह चार मातब्बर उमेदवारांची तिकिटे कापणे काँग्रेस आयच्या चांगलेच अंगलट आले हाेते. सुरेश जैन काँग्रेस एस. कडून विजयी झाले, तर इतर जागांवर काँग्रेस आयचे चारही उमेदवार पडले. या निवडणुकीनंतर प्रतिभाताई पाटील कधीही विधानसभा लढल्या नाहीत. जळगावच्या राजकारणाला या निवडणुकीनंतर कलाटणी मिळाली.