आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वंचित’मध्ये भाजप-संघाचा हस्तक्षेप; आंबेडकरांंची मनमानी : लक्ष्मण माने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - डॉ. प्रकाश आंबेडकर मनमानी कारभार करत असून निवडणुकीत उमेदवारी देताना काेणालाही विचारत घेत नाहीत. त्यामुळे लाेकसभेला ज्या चुका झाल्या त्या विधानसभेला करणे परवडणार नाही. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाेकांना जवळ करून त्यांना पक्षात मोठी पदे देत असल्याने संघाचा हस्तक्षेप पक्षाच्या कामकाजात झाल्याचे निष्पन्न हाेत आहे. या कारणास्तव आंबेडकरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य लक्ष्मण माने यांनी करत स्वत: पक्षाचा राजीनामा दिला आहे. 


माने म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडून आम्ही खूप अपेक्षा बाळगून हाेताे, परंतु पक्षाच्या संस्थापक सभासदांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत आहे. संघात वाढलेले तसेच संभाजी भिडेंचे धारकरी असलेले गोपीचंद पडळकरांना लाेकसभेचे तिकीट आणि आता पक्षाचे महासचिव व प्रवक्तेपद दिले. डाॅ. अंजारिया हे संघाचे मुस्लिम समाजातील हस्तक व भाजपचे नेते असून त्यांना सचिव केले आहे. काँग्रेसप्रमाणेच आंबेडकर केवळ आमचा वापर करत असून ‘वापरा आणि फेका’ अशी रणनीती आहे. संघाची घुसखाेरी आमच्या पक्षात झाली असून त्यामुळे माझी अस्वस्थता वाढली व मी राजीनामा दिला.  लाेकसभेत वंचितने आघाडीसाेबत लढण्याची गरज हाेती. दाेन ते तीन जागा मिळू शकल्या असत्या. परंतु स्वतंत्र लढल्याने युतीला १० ते १२ जागांवर फायदा झाला ही माझ्या आयुष्यातील सर्वात माेठी चूक आहे, अशी खंतही मानेंनी व्यक्त केली.  

 

आंबेडकर पुरोगामी पक्षांसोबत एकत्र आल्यास सतरंज्याही उचलू
एमआयएमचा निवडणुकीत काहीच फायदा झाल्याचे दिसून आले नाही. माझा राजीनामा न स्वीकारणे हे आंबेडकरांचे माेठेपण असून ते सर्व पुराेगामी पक्षांशी बाेलणे करून एकत्रित भूमिका घेण्यास तयार असतील तर मी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे, असे माने म्हणाले.