आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरं सीमाेल्लंघन करण्याचा प्रेरक मंत्र... 'कर के देखाे!'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सीमाेल्लंघनाचा दिवस. नवं काही घडवण्यासाठी आपल्या सीमारेषा आेलांडण्याचा दिवस. मतदारांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पर्यायानं देश घडवण्यासाठी वैचारिक आणि मतरूपी कृतिप्रधान सीमाेल्लंघन करायचं आहे. मी स्वत:चंच उदाहरण देईन. मी मतदान करताना उमेदवारांचं चारित्र्य व कार्यक्षमता सर्वात आधी काळजीपूर्वक पाहीन. स्वच्छ आर्थिक व्यवहार हा चारित्र्याचा पहिला निकष आहे. पण, तेवढं पुरेसं नाही. ते तर हवंच. त्याचबराेबर ताे किंवा त्याचे कार्यकर्ते मत मागण्यासाठी आले तर याबाबत चर्चा करीन आणि िकमान पाच प्रश्न विचारीन, ते असे...

१) 'असर'चा अहवाल वाचला का? आमदार निधीचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करणार का? इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मराठी सक्तीने शिकवण्याचा कायदा करण्यास पाठिंबा आहे का? मराठी शाळांना मंजुरी निर्देशांचे धाेरण बदलणार का?

२) बेराेजगारी निर्मूलनासाठी पाच वर्षांत काय करणार? लघु-मध्यम आणि कुटिराेद्याेगाविषयी आऊट आॅफ बाॅक्स कल्पना आहेत का?

३) शेती, सिंचन आणि पर्यावरणाविषयी काेणता दृष्टिकाेन मतदारांना देणार ते पाहीन.

४) साहित्य, संस्कृती आणि क्रीडा या साॅफ्ट पाॅवर आहेत. माझा उमेदवार किती सांस्कृतिक साक्षर आहे, हे पाहीन.

५) मतदारसंघातील प्रश्नांची साेडवणूक करण्यासाठी ताे काय बदल घडवून आणेल?

या पाच प्रश्नांची जी काही उत्तरे मिळतील त्या आधारावर काेणत्याही बाह्य प्रलाेभनाला बळी न पडता मी मतदानरूपी सीमाेल्लंघन देश घडवण्यासाठी करेन. राजकीय पक्ष किंवा सरकारच देशाचा विकास घडवतात या भ्रमात मी नाही. देशाचे भवितव्य तुमच्या-माझ्या हातात आहे. आपल्या परीने काहीतरी निरंतर करीत राहणे हेदेखील सीमाेल्लंघन नाही का? प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून जगवायचं ठरवलं तर पर्यावरण किती सुधारेल? पाणी, वीज आणि इंधन जपून वापरण्याचा निर्धार हे विकासाचे शाश्वत सीमाेल्लंघन नाही का? मुंबईतील 'आरे'मध्ये वृक्षताेडीविराेधात जाे आवाज उठला तसा प्रत्येक अन्याय, शाेषणाविरुद्ध आवाज का नाही उठवला जात? एक भारतीय म्हणून खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्यासाठी वाईटाविरुद्ध आवाज उठवून नवं सीमाेल्लंघन नाही का करू शकत? माझ्या भवताली असलेल्या अनेकांच्या मनात जात आहे. दुसऱ्या धर्माविषयी आंधळा राग आहे. स्त्री, दलित, अल्पसंख्याक समाजाचे दमन करणाऱ्या अविवेकी जमावाचा भाग बनण्याचे नाकारता येणार नाही का? 

साेशल मीडियावर खाेटी माहिती प्रसारित करणार नाही, किंबहुना फाॅरवर्ड करणे तरी थांबवणार नाही का? बंधुभाव, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हे सीमाेल्लंघन ठरेल. मी काटकसरीने, साधेपणाने राहीन. कशाचाही हव्यास करणार नाही. भारतीय संविधान श्रद्धेने आचरणात आणीन, विज्ञाननिष्ठ हाेईन. हे म्हटलं तर साेपं आणि अंगी बाणवण्यासारखं आहे. परंतु सत्य स्वीकारून तशी कृती करण्याची तत्परता दाखवण्याचं मीच का, आपला समाज विसरून गेला आहे. ती जाण येणं आणि कृतिप्रवण हाेणं हे सीमाेल्लंघन आहे, ही खरी विजयादशमी असेल. म. गांधींनी 'करके देखाे!' या लहानशा मंत्रातून विश्वास दिला आहे. आपण खरंखुरं सीमाेल्लंघन करूया!!

लक्ष्मीकांत देशमुख,  

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...