आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- समृद्धीचे महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेला फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर आता औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे भूसंपादनही पूर्ण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ११८२ हेक्टर आणि जालना जिल्ह्यात ४६४ हेक्टर जमीन प्रत्यक्ष ताब्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. भूसंपादन पूर्ण झाले असून आता प्रशासनालाही उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून समृद्धीचा महामार्ग जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६१ गावांतून हा रस्ता जाणार असून साधारण ११२ किमीच्या रस्त्यासाठी औैरंगाबाद गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात भूसंपादन करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी १३४० हेक्टर जमीन संपादित करायची आहे. यामध्ये ९८० हेक्टर खरेदीने प्राप्त झाले आहे. तर १६४.२३ हेक्टर सरकारी विभागाकडून मिळालेली आहे. तर १५७ हेक्टरचे निवाडे झालेले असून याबाबत ताबा अजून मिळालेला नाही. याबाबत न्यायालयीन वाद सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आत्तापर्यत जवळपास १५०० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. तर जालना जिल्ह्यात ५१० हेक्टर संपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी ४६४.०७ हेक्टर संपादन पूर्ण झाले आहे. त्यापैकी ३४७.०५ हेक्टर खरेदीने प्राप्त तर ७५.७१ हेक्टर सरकारी व इतर विभागाकडून मिळाले आहे. ४६.६५ हेक्टर क्षेत्र ताब्यात मिळायचे असून याचे देखील निवाडे पूर्ण झाले असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपजिल्हाधिकारी एच.व्ही.अरगुंडे यांनी दिली आहे.
उद्घाटनासाठी पंतप्रधान येणार
समृद्धी महामार्गासाठी रेडिरेकनरच्या पाचपट दर देण्यात आला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतर मोठ्या रकमा मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या विरोध मावळल्याचे चित्र पाहायला मिळाले. समृद्धी महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यासह अनेक मंत्री येणार असल्यामुळे त्यांच्या तारखेबाबत अजून निश्चिती झाली नसली तर लवकरच उद््घाटनाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
सर्वात कमी वेळेत झाले भूसंपादन
औरंगाबाद आणि जालना दोन्ही जिल्ह्यात समृद्धीचे भूसंपादन पूर्ण झाले असून देशात सर्वात कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन पूर्ण झाले आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक दर समृद्धी महामार्गात मिळालेला आहे. एच.व्ही.अरगुंडे, उपजिल्हाधिकारी, एमएसआरडी.सी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.