आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर : महसूल खात्याच्या जागेवर राज्य शासनाच्या पैशातून उभे राहत असलेल्या लातूरमधील नाट्यगृहाला नाव देण्याचा महापालिकेला अधिकारच नाही. तरीही मनपात भाजपची सत्ता असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे तर सत्ताबदल झाल्यानंतर काँग्रेसने आता रंगकर्मी श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव दिले. या नामांतरावरून लातूरमध्ये वाद उफाळून आला. नाट्यगृहाची उभारणी होण्याअगोदरच नावावरून वाद सुरू झाल्यामुळे कलाप्रेमी संतापले आहेत.
विलासरावांनी पंचवीस वर्षांपासून प्रयत्न करूनही केवळ वाद उफाळून आल्यामुळे नाट्यगृह होऊ शकले नव्हते. प्रारंभी टाऊन हॉल मैदानावर नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र या मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असल्यामुळे तेथे नाट्यगृह करण्यास दलित समाजातील पुढाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे नाट्यगृहाची जागा बदलून सध्याच्या नाना-नानी पार्कच्या जागेची निवड झाली. तेथे लता मंगेशकरांच्या नावाने नाट्यगृहाची उभारणी सुरू झाली. मात्र त्या जागेचाही वाद उफाळला. त्यामुळे अर्धवट बांधकाम अवस्थेतील ती इमारत दहा वर्षे तशीच उभी होती. पुढे तेथे नाना-नानी पार्क उभारण्यात आले आहे.
सहा वर्षांपूर्वी अमित देशमुखांनी राज्यमंत्री झाल्यानंतर आयटीआय कॉलेजच्या मैदानात नाट्यगृहाचे भूमिपूजन केले, परंतु पुढे सत्ता गेली आणि हा प्रस्तावही बारगळला. २०१४ साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर लातूर मनपातही भाजप सत्तेवर आली.
त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी नाट्यगृहासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. तरीही जागा अंतिम करण्यात एक वर्ष गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारची महसूल खात्याची जागा नाट्यगृहासाठी अंतिम झाली. त्याचवेळी मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांनी या नाट्यगृहाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे नाव देण्याचा ठराव घेतला. दरम्यान, सध्या या इमारतीच्या पिल्लर उभारणीचे प्राथमिक काम सुरू आहे. काँग्रेसने बांधकाम सुरू असलेल्या नाट्यगृहाला लातूरचे दिवंगत रंगकर्मी, अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेतला. अटलबिहारी वाजपेयींचे नाव बदलल्यामुळे भाजप पक्ष आक्रमक झाला आहे.
काँग्रेस-भाजपची भूमिका
लातूरचे भूमिपुत्र असलेल्या अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक श्रीराम गोजमगुंडे यांची चित्रपट, नाट्यक्षेत्रात वेगळी ओळख होती. त्यांनी १९७४ साली राजा शिवछत्रपती चित्रपटात मुख्य भूमिका केली. सलग ३ वर्षे महाराष्ट्र नाट्य परिषदेचे प्रथम पारितोषिक मिळवले होते. दिवंगत नेते विलासराव देशमुख श्रीराम गोजमगुंडे यांचा उल्लेख मराठवाड्याचे राज कपूर असा करायचे. त्यामुळे लातूरच्या भूमिपुत्राचा गौरव म्हणून नाट्यगृहाला त्यांचे नाव द्यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, तर अटलबिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान, कवी, भारतरत्न होते. त्यामुळे त्यांच्या नावासाठी भाजप आग्रही आहे.
नाट्यगृहाच्या वादाची परंपरा कायम
लातूरमध्ये नाट्यगृह नसल्याची खंत कलाप्रेमींमध्ये होती. गेल्या तीस वर्षांत याला वादामुळे मूर्त रूप येऊ शकले नव्हते. आता सगळे सुरळीत झाले असे वाटत असतानाच नवा वाद उफाळून आला असून नाट्यगृहाच्या वादाची परंपरा कायम राहिली आहे. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयींचे नाव बदलल्यामुळे भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. रविवारी होणाऱ्या मंत्री अमित देशमुखांच्या नागरी सत्काराला विरोध करण्याचा इशारा दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.