आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूम, उमरग्याला वादळाचा तडाखा; केळीची बाग भुईसपाट, अनेक घरांवरील पत्रे उडाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - उकाड्याने त्रस्त झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला दोन दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सोमवारी (दि.३) उस्मानाबाद शहरासह भूम, उमरगा, परंड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.  वादळाने भूम तालुक्यातील देवंग्रा येथे केळीची बाग आडवी झाली तर उमरग्यात घरावरील पत्रे उडून आल्याने गाय जखमी झाली. उमरग्यात अर्धा तास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. परंड्यातही मध्यम सरी बरसल्या.


उमरगा शहरासह परिसरातील गावांत सोमवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह वादळी वारा व पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास झालेल्या पावसाने शहर जलमय झाले. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सायंकाळी उमरगा शहरासह बलसूर, जकेकूर चौरस्ता यासह कोरेगाव, गुगळगाव, वागदरी परिसरातील गावात चार ते साडेचार दरम्यान मेघगर्जनेसह अर्धा तास पाऊस झाला. पुन्हा सव्वा पाचच्या सुमारास पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र गारवा जाणवू लागला आहे. सायंकाळी विजांचा गडगडाट व ढग भरून असल्याने रात्री सर्वदूर पावसाची शक्यता दिसून येत होती.  कोरेगाव येथे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने विजेच्या तारा तुटल्या गावचे उपसरपंच विश्वजित खटके यांच्या टपरीवर झाडाची फांदी पडल्याने टपरीचे मोठे नुकसान झाले. 

 

वादळामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान

भूम तालुक्यातील देवंग्रा येथील केळी उत्पादक शेतकरी अनिल डोके यांच्या शेतातील केळी वादळी वाऱ्यात भुईसपाट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनिल डोके यांनी दुष्काळावर मात करून केळीचे पिक जोमात आणले होते.   केळीच्या झाडांना चांगले फळही लागले होते. त्याची विक्री दहा ते पंधरा दिवसांत करण्यात येणार होती. परंतु  वादळी वाऱ्यात एक एकर क्षेत्रातील पाचशे केळीची झाडे भूईसपाट झाली आहेत.   परंडा शहरासह काही भागात सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वारे झाले. सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान १५ मिनिटे सरी बरसल्या उस्मानाबादेतही सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. दुपारीही काही भागात हलक्या सरी कोसळल्या.  देवंग्रा (ता.भूम) येथील शेतकरी अनिल डोके यांच्या शेतातील केळीची एकरभर बाग  भुईसपाट झाली.