आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेकरू मुलींचे व्हिडिओ काढणारा मालक अटकेत; मोबाइलच्या अॅडॉप्टरमध्ये लपवला होता छुपा कॅमेरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत भाड्याने राहणाऱ्या (पेइंग गेस्ट) मुलींचे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढणाऱ्या घरमालकाला पाेलिसांनी अटक केली आहे. माेबाइल फाेनमध्ये असलेल्या अॅडॉप्टरमध्ये त्याने हा कॅमेरा लपवला होता.  संशय आल्याने मुलींनी याची पाेलिसांत तक्रार दिली होती. 


वयाेवृद्ध आईवडिलांबराेबर राहणारा हा ४७ वर्षीय घरमालक अविवाहित असून त्याचा गिफ्ट बाॅक्सची विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या ४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये  ४ मुली पेइंग गेस्ट म्हणून राहत हाेत्या. मुली राहत असलेल्या खाेलीत त्याने एक कॅमेरा मोबाइल फोनच्या अॅडॉप्टरमध्ये खुबीने लपवून ठेवला हाेता. काही दिवसांपासून तो या मुलींचा संवाद त्यांनाच ऐकवत हाेता. हा संवाद मुलींनी खासगीत केला होता. मात्र, तो घरमालक तंतोतंत बोलून दाखवत असल्यामुळे मुलींना त्याच्यावर संशय आला.  दरम्यान, त्यांना खोलीत इलेक्ट्रिक अॅडॉप्टर लावल्याचे आढळले. त्यानंतर मुलींनी त्यावर कापड झाकले. त्यानंतर घरमालक तातडीने त्यांच्या खाेलीत तपासणी करण्याच्या बहाण्याने आला व अॅडॉप्टरवर टाकलेले कापड काढून टाकण्यास सांगितले. हे अॅडॉप्टर अापल्या टीव्हीचा अँटिना बुस्टर असल्याचा दावाही त्याने केला.  

घरमालकास अटक, जामीन  
संशय आल्याने मुलींनी तत्काळ डीबी मार्ग पाेलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या चौकशीत अॅडॉप्टरमध्ये कॅमेरा आढळून आला व तो चित्रीकरण करत असल्याचेही स्पष्ट झाले.  पाेलिसांनी अॅडॉप्टर जप्त करून महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली  घरमालकाला अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

बातम्या आणखी आहेत...