आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याचा खात्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/सोपोर/नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलाने चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आसिफ मकबूल भट्ट याचा खात्मा केला. पोलिसांनी टि्वटद्वारे ही माहिती दिली. सोपोरच्या डांगपुरा येथील घाऊक फळ व्यापारी हमीदुल्लाह राथेर यांच्या घरावर सहा सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात आसिफचा सहभाग होता आणि अडीच वर्षांच्या अस्मा या बालिकेची त्याने गोळी घालून हत्या केली होती. अतिरेक्यांनी राथेर यांच्या २५ वर्षीय तरुण मुलालाही गोळ्या घातल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गंभीर जखमी अस्माला उपचारासाठी दिल्लीत एम्स येथे पाठवले होते.  सुरक्षा दलाच्या संयुक्त मोहिमेत ९ सप्टेंबरला अतिरेक्यांच्या एका कटाचा पर्दाफाश केला होता आणि त्यानंतर सोपोर भागातून आठ अतिरेक्यांना अटक केली होती. सोपोरचे एसएसपी जावेद इक्बाल यांनी सांगितले की, अतिरेकी स्थानिक लोकांना भीती दाखवत होते. 

लँडलाइन फोन सुरू, मोबाइल इंटरनेटवर निर्बंध 
राज्यात पाच ऑगस्टला लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. लँडलाइनवरील निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत, तर खबरदारी म्हणून मोबाइल, इंटरनेट सेवांवरील निर्बंध कायम आहेत. मोबाइल सेवा ठप्प झाल्याने एसटीडी बूथवाले लोकांकडून लोकल कॉलसाठी प्रति मिनिट १० रुपये वसूल करत आहेत. श्रीनगर आणि खोऱ्यातील इतर जिल्ह्यांतील लँडलाइन सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच नव्या कनेक्शनसाठी बीएसएनएल कार्यालयांबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत.