आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत रेखांकन, बांधकामप्रकरणी डेव्हलपर्सविरोधात अखेर गुन्हा दाखल; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- सिडको प्रशासनाच्या अधिसूचित क्षेत्रातील वडगाव कोल्हाटी हद्दीतील गट क्रमांक ५,६,७,१०/१,१०/२,११,१२ तसेच मौजे शेकापूर येथील गट क्रमांक ६ मध्ये सिडको प्रशासनाच्या अधिसूचित क्षेत्रातील जागेवर सिडको प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृतरीत्या रेखांकन/बांधकाम करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम ५४ अन्वये रेखांकन व बांधकाम करणाऱ्या डेव्हलपर्सविरोधात २८ नोव्हेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

 
याच संदर्भात २२ नोव्हेंबर रोजी आमदार संजय शिरसाट यांनी सिडकोच्या मुंबई कार्यालयात धाव घेत उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सिडको प्रशासनाकडून या अधिसूचित क्षेत्राचा कुठलाही प्रकारचा विकास करण्यात आलेला नसून हे क्षेत्र हे सिडकोतून वगळण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सिडको प्रशासनाकडून मोठ्या कष्टाने उभारलेल्या घरांवर गदा आणली जाते की काय, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांतून चर्चेला उधाण आले आहे. 

 

सिडको प्रशासनाच्या अधिसूचित क्षेत्रातील वडगाव कोल्हाटी व मौजे शेकापूर येथील गट नंबरमधील जमिनीवर संबंधित डेव्हलपर्सनी अनधिकृत रेखांकन/बांधकाम केल्याचा प्रकार सिडको प्रशासनाकडे काही तक्रारदारांनी लेखी स्वरूपात तक्रार केल्यानंतर निदर्शनास आला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने २४ एप्रिल २०१८ ते २१ जून २०१८ दरम्यान प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली असता वरील प्रमाणे गट नंबरमध्ये अनधिकृत रेखांकन व बांधकाम असल्याचे सिडको पथकाच्या निदर्शनास आले. दरम्यान, या प्रकरणी पाहणी व चौकशीअंती प्रशासनाच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांत संबंधितांविरोधात लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

नागरिकांची फसवणूक, यांच्या विरोधात गुन्हा दाखल 
अनधिकृतरीत्या रेखांकन/बांधकाम केल्याप्रकरणी मौजे वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर ५ येथे मे. एएएफएस इन्फास्ट्रक्चर द्वारा एस. के. पाटील, ए. के. ताजणे, सुभाष औताडे, बाबासाहेब साळुंके पाटील, विकी परसवाणी, मौजे शेकापूर येथील गट नंबर ६ मधील कृष्णा रावसाहेब पवार, मौजे वडगाव को. गट नं.७ येथील श्रीराम प्लाॅटिंगचे गोविंद रामलिंग सोलपुरे व इतर तसेच गट नंबर १०/१,१०/२ येथील मे. स्वस्तिक डेव्हलपर्स, गट नंबर ११ मधील किशोर भीमराव म्हस्के, विजय एकनाथ साळे, मोहंमद इक्बाल मोहंमद रमजान, कर्नल आशुतोष जोशी, सुभेदार बॅनर्जी, सुभेदार मेजर बलविंदर सिंग, सुभेदार गोविंदा, डाॅ.चंद्रशेखर पाठक, शंकर गणपतराव सोनवणे, गट नंबर १२ श्रीराम प्लॉटिंग, साई रेसिडेन्सी संदीप महापुरे यांच्या विरोधात अनधिकृतरीत्या रेखांकन व बांधकाम करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...