आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लातूर : लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील याकतपूर येथून हरियाणातील हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या मिनी बसला राजस्थानातील नागौर जिल्ह्यातल्या कुचमानसिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी आहेत. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातील ६, सोलापूर जिल्ह्यातील २, तर परभणी, सांगली, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दोघे कर्नाटकातील असल्याची माहिती असून त्याला दुजोरा मिळालेला नाही. जखमींवर नागौर येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर, सोलापूर, जिल्ह्यातील काही जण आपल्या नातेवाईक, मित्रांसोबत हरियाणातल्या हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. त्यांची मिनी बस (एमएच २३ एएस ७१७६) शनिवारी पहाटे तीन वाजता राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुचमान पोलिस ठाण्याच्या हद्दीत किशनगड-हनुमानगड मेगा हायवेवरून जात असताना बसच्या समोर अचानक एक रानगवा आला. त्याला या मिनी बसने धडक दिली. या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली ही बस त्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळली. बसचा वेग जास्त असल्यामुळे बसचा चक्काचूर झाला. या अपघातात गाडीतील १३ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कुचामन येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे
ज्ञानेश्वर वसंत शेळके (३५), गायत्री ज्ञानेश्वर शेळके (६), श्रावणी ज्ञानेश्वर शेळके (२), लक्ष्मी पांडुरंग शेळके (३०), प्रताप वसंत शेळके (३५, सर्व रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), आदर्श सांगवे (६, रा. लामजना, जि. लातूर), अनोळखी महिला (४०), अनोळखी मुलगा (७).
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर, सोलापूर, परभणी, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर भागांतून निघालेले हे भाविक वादग्रस्त बाबा रामपाल यांच्या दर्शनासाठी निघाले होते. सध्या रामपाल हरियाणात तुरुंगात शिक्षा भोगत असून त्यांना कोर्टात सादर करत असताना त्यांचे दर्शन होईल म्हणून हे भाविक हरियाणाकडे निघाले होते. दोन बसमधून सर्व तयारीनिशी निघालेल्या या भाविकांना काळाने राजस्थानातच गाठले.
भाषेमुळे ओळख पटवण्यात अडचणी
कुचामन शहराजवळ मिनी बसचा अपघात झाल्यानंतर शेजारून जाणाऱ्या स्थानिक वाहनांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. नागौर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांमार्फत लातूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात संपर्क करण्यात आला. मात्र भाषेच्या अडचणीमुळे नावांचा, गावांचा उच्चार करण्यात तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यातही अडचणी येत होत्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी औसा तहसीलदारांना याची माहिती देऊन याकतपूर गावातील मृतांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. काही नातेवाईक तातडीने राजस्थानकडे रवाना झाले आहेत.
मृतांची नावे
भगवान बेंबडे (५०), मयूरी बेंबडे (१८, दोघेही रा. याकतपूर, ता औसा, जि. लातूर), सुमित्रा गोवर्धन सांगवे (३५), सिद्धी गोवर्धन सांगवे (९, दोघेही रा. लामजना, ता. औसा, जि. लातूर), सुप्रिया बालाजी पवार (१६), अरुणा हणमंत तौर (५५, दोघेही रा. किल्लारी, जि. लातूर), शालूबाई वसंत शेळके (६०), रुक्मिणी ज्ञानेश्वर शेळके (दोघेही रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), रामचंद्र तुकाराम पवार (३०, रा. सांगली), शिवप्रसाद दत्ता ठाकूर (२८, रा. परभणी), श्यामजी गायकवाड (५५), बळीराम बालाजी पवार (२७, दोघेही रा. कर्नाटक), गोविंद (पूर्ण नाव समजलेले नाही, २८, रा. बीड) असा एकूण १३ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
गाडी बीड जिल्ह्यातील
अपघातग्रस्त बस बीड जिल्ह्यातील असून ती गोविंद रामकिसन इंगळे (रा. जोधवाडी, जि. बीड) यांच्या नावावर गाडीची नोंदणी आहे. त्याचबरोबर गोविंद नावाचा चालक गाडी चालवत होता. त्याचा मृत्यू झाला असून चालक आणि मालक वेगवेगळे आहेत काय, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. या भागातून निघालेले ४१ भाविक दोन मिनीबसने रवाना झाले होते. मात्र, राजस्थानातील नागौर जिल्ह्यात या भाविकांच्या बसला हा भीषण अपघात झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.