आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरचे महापौरपद ओबीसीला राखीव झाल्याने चुरस वाढली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूरचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान सत्ताधारी भाजप आणि तितकेच सक्षम असलेल्या काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून दोन्ही बाजूकडील ओबीसी नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.  विशेष म्हणजे अडीच वर्षांपूर्वी खुल्या प्रवर्गाला महापौरपद सुटले असतानाही लातूरचे महापौरपद ओबीसी प्रवर्गाकडेच राहिले होते.
लातूर शहर महानगर पालिकेचे पहिले अडीच वर्षे संपले असून दुसऱ्या अडीच वर्षांसाठी बुधवारी मंत्रालयात सोडत काढण्यात आली. अडीच वर्षांपूर्वीच्या सर्वसाधारण निवडणूकीत एकूण ७० जागांपैकी भाजपला ३६, काँग्रेसला ३३ तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. महापौरपद खुल्या प्रवर्गाला सुटल्यानंतर काठावर बहुमत असलेल्या भाजपने महापौरपद मिळवले. या वेळेस पुन्हा एकदा ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद राखीव झाले आहे. राज्यातील बदलत असलेले सत्ता समीकरण पाहता राज्याप्रमाणेच लातूर मनपातही भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसने जोर लावावा असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. त्यासाठी मूळच्या काँग्रेसच्या आणि सध्या भाजपत असलेल्या नगरसेवकांना गळाला लावले तर सहजपणे मनपा काँग्रेसच्या ताब्यात येऊ शकते, अशी अपेक्षा काँग्रेसजनांकडून व्यक्त केली जात आहे.  काँग्रेसकडून माजी महापौर दीपक सूळ, नगरसेवक सचिन बंडापल्ले, विक्रांत गोजमगुंडे असे अनेकजण इच्छुकांच्या यादीत आहेत.
 

भाजपही जोरदार तयारीत
दरम्यान, ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सुटल्यानंतर भाजपतही जल्लोषाचे वातावरण आहे. उपमहापौर देविदास काळे, भाजपचे गटनेता शैलेश गोजमगुंडे हे दोघे महापौरपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.  काँग्रेसमध्ये नगरसेवक गुडघ्याला बाशिंग लावून बसले असले तरी भाजपत सगळे काही आलबेल असून भाजपचा महापौर होईल, असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...