आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या महापौर, उपमहापौरांच्या राजीनाम्यावरून पालिकेत संभ्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती या मनपातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे राजीनामे दिले असून आता नवे पदाधिकारी निवडले जातील असे सांगत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी रविवारी रात्री खळबळ उडवून दिली. मात्र महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी मात्र आपण राजीनामा दिल्याचा इन्कार केला. या प्रकारामुळे भाजपतील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी लातूरमध्ये पक्ष बैठकीत व्यस्त असतानाच त्यांच्या अपरोक्ष लातूर शहर भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू होती. 

 

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. खासदार, तीन आमदार, जिल्हा परिषद, मनपा ही सत्तास्थाने पक्षात आली. मात्र पक्षात जुने आणि नवे असे दोन गट पडले आहेत. त्यातही महानगरपालिकेतील भाजप पाच-सहा गटांत विभागली असून कोणाचा कोणाला मेळ नाही. मनपातील काँग्रेसमध्येही तशीच स्थिती असल्यामुळे मनपात एकूणच अभूतपूर्व गोंधळाची स्थिती आहे. यातून मार्गक्रमण करीत असतानाच रविवारी रात्री गप्पांच्या ओघात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे आणि स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी आपल्याकडे राजीनामे दिले असून आता नवीन पदाधिकारी निवडले जाणार असल्याचे सांगितले. पाहता-पाहता या माहितीची बातमी झाली. सोशल मीडियावर कोणाचेही नाव न घेता पोस्ट फिरू लागल्या. याबाबत खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत आपल्याला कुणी राजीनामा मागितलेला नाही आणि आपण तो दिलेला नाही असे सांगितले. उर्वरित नगरसेवकांना तर नक्की काय प्रकार सुरू आहे याबाबत कसलीच माहिती नाही. काँग्रेसमध्येही या प्रकाराकडे सावधगिरीने पाहिले जात आहे. 

 

राजीनामे म्हणजे नाटक- गोविंदपूरकर : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे म्हणजे नाटक आहे. आपण दोन दिवसांपूर्वीच महापौरांवर अनधिकृत बांधकाम केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ केले जाऊ शकते. संभाव्य नाचक्की टाळण्यासाठी महापौरांसह सर्वांचेच राजीनामे घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु पवार आणि स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांच्याशिवाय कुणाचाच राजीनामा घेतला जाणार नाही, असे काँग्रेस नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी सांगितले. 

 

महापौरांवर झाले आरोप 
महापौर सुरेश पवार यांनी पदाचा दुरुपयोग करून चुकीची कागदपत्रे देऊन अनधिकृत बांधकाम केले आहे. बांधकाम परवाना देताना नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे त्यांना आयुक्तांनी निलंबित करावे अशी मागणी काँग्रेसने केली होती. महापौरांनी कामगार विभागाचा उपकरही बुडवला, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. 

 

कथित राजीनाम्यामुळे वादाची पुनरावृत्ती 
लातूर महापालिकेत गेल्या वेळी शून्य जागा असलेल्या भाजपने मोठ्या ताकदीने मुसंडी मारत दीड वर्षांपूर्वी मनपात एकहाती सत्ता मिळवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने लातूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याची संधी आहे. परंतु पक्षात एकसूत्रीपणा नसल्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. तीन महिन्यांपूर्वीही महापौरांनी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेला भाजपच्याच नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यामुळे पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. सध्याच्या चर्चित कथित राजीनामा प्रकारामुळे वादाची पुनरावृत्ती झाली असून भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...