Sangli flood / पूरग्रस्त सांगलीत मदतीसाठी गेलेल्या लातूरच्या पशुरोगतज्ञाचा मृत्यू

मिरज तालुक्यातील पूरग्रस्त नांद्रे आणि कर्नाळ गावात सेवा बजावली

प्रतिनिधी

Aug 19,2019 09:34:00 AM IST

लातूर - पूरग्रस्त भागातील जनावरांवर उपचार करण्यासाठी सांगलीत गेलेल्या लातूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकातील पशुधन पर्यवेक्षक नारायण खरोळकर यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दु:ख व्यक्त केले.


कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराच्या तडाख्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. बचावलेली जनावरे साथीच्या आजारांना बळी पडू नयेत यासाठी सरकारने राज्यातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूरग्रस्त भागात मदतीसाठी पाठवले आहे. लातूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकात खरोळकर यांचा समावेश होता. ते चार दिवसांपूर्वी सांगलीत पोहचले होते. शनिवारी सकाळपासून मिरज तालुक्यातील पूरग्रस्त नांद्रे आणि कर्नाळ गावात सेवा बजावली. त्यांनी अनेक जनावरांवर उपचार केले. त्यानंतर ते सायंकाळी सांगलीत मुक्कामाला गेले. मात्र, रविवारी पहाटे त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

X
COMMENT