आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पाणीपुरवठा योजनेचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांची निवड केली असून लातूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उजनी धरणातून लातूरला मांजरा धरणाच्या माध्यमातून पाणी येणारच, असा पुनरुच्चार पालकमंत्री अमित देशमुख यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लातूर शहर पाणी पुरवठा व शहरातील वाहतूक व्यवस्था बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते.
अमित देशमुख पुढे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पाणी पुरवठा योजनेसाठी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर पथदर्शक प्रकल्प (पायलट प्राेजेक्ट) म्हणून निवड केलेली आहे. लातूर शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा व शहराला दररोज पाणी मिळावे यासाठी खास बाब म्हणून उजनी धरणातील पाणी धनेगाव मार्गे लातूरला येणार आहे. पाणीपुरवठा योजनेचे वाढते वीज बिल भरणे मनपाला अशक्य होत असून मांजरा धरणावरच सौरउर्जा प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव तातडीने द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत अमित देशमुख म्हणाले की, शहरातील रस्त्यालगत पार्किंग व्यवस्था करून शहरातील मुख्य रस्त्याच्या शासकीय जागा त्वरीत मोकळया कराव्यात. शहरात ट्राफिक पार्क उभे करावेत. शहरातील रस्त्यांवर १५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी दिला जाईल. रिंगरोडवरील सर्व्हिस रस्ते मोकळे करावेत.
वीज देयकासाठी महावितरणशी चर्चा करण्याची सूचना
महानगरपालिकेने विद्युत देयकाबाबत महावितरणबरोबर चर्चा करून ताबडतोब निर्णय घ्यावा तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरणपूरक अद्ययावत यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले
.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.