आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमधील विजयाचे शिल्पकार पालकमंत्री संभाजी निलंगेकरांची पक्षांतर्गत उंची वाढणार; सूक्ष्म नियाेजनामुळे निर्णायक आघाडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - राज्यात सर्वाधिक मतांच्या आघाडीने लातूर भाजपची जागा निवडून आणण्याचा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोडलेला संकल्प प्रत्यक्षात उतरला अाहे. भाजपने लातूरमध्ये २ लाख ८० हजार मतांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात या वेळी काँग्रेसने उमेदवार निवडीपासून प्रचारात घेतलेली भूमिका काँग्रेससाठी आत्मघातकी ठरली आणि भाजपने अत्यंत सूक्ष्म पातळीवर केलेले प्रचाराचे नियोजन आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रचारात घेतलेली मेहनत त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणारी ठरली.


मागील लोकसभा निवडणुकीत असलेल्या मोदी लाटेत सुनील गायकवाड २ लाख ५२ हजार मतांनी विजयी झाले होते. यंदा ऐनवेळी गायकवाडांची उमेदवारी बदलण्यात आली. त्यांना रिंगणात उतरवले तर लातूरमध्ये पराभव होऊ शकतो, हे संभाजी निलंगेकरांनी श्रेष्ठींना पटवून दिले. एवढेच नव्हे तर नवी मुंबईत कंत्राटदार असलेले आणि सध्या लातूर जि. प. चे सदस्य असलेल्या सुधाकर शृंगारे या नवख्या उमेदवाराला तिकीट दिल्यास त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांनी उचलली. मुख्यमंत्र्यांनी निलंगेकरांच्या विश्वासाला बळ देत शंृगारेंना उमेदवारी देण्यासाठी शब्द खर्ची घातला. त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली. निलंगेकरांनी जिल्ह्यातील नाराजांची आणि विधानसभेला इच्छुक असणाऱ्यांची मोट बांधली. कार्यकर्त्यांना कामाला लावले.  प्रत्येक कार्यकर्त्याला आपणच उमेदवार असल्याचे सांगून आपापल्या बूथवर एकाने दहा मतांची जाडजोड लावायचे उद्दिष्ट दिले. जिल्ह्यात ७२ बूथ मेळावे घेतले. प्रत्येक बूथ मेळाव्यात सुमारे एक हजार कार्यकर्ते सामील असायचे. प्रत्येकाने दहा मते करवून घेतली, तर भाजपच्या उमेदवाराला किमान ७ लाख २० हजार मतदान पडेल असा हिशोब घालून प्रचाराची राळ उडवत भाजपला विजय मिळवून दिला. 

 

सूक्ष्म नियाेजनामुळे निर्णायक आघाडी
भाजपच्या सूक्ष्म नियोजनामुळेच काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या हक्काच्या विधानसभा मतदारसंघातही भाजपला निर्णायक आघाडी मिळाली. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग  सुकर झाला.

बातम्या आणखी आहेत...