आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीतील वीज निर्मिती केंद्राला घरघर, मात्र अधिकारी उडवताहेत लावणीचा बार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औष्णिक विद्युत केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात नृत्य करताना एक लावण्यवती. - Divya Marathi
औष्णिक विद्युत केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात नृत्य करताना एक लावण्यवती.

धनंजय आढाव  

परळी  - एकेकाळी वीज निर्मितीत उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एकापाठोपाठ एक संच बंद पडत  आहेत. कधी कोळशाचा तुटवडा तरी कधी पाणीटंचाईमुळे केंद्र बंद करावे लागत असल्याने दोन वर्षांपासून या केंद्राला घरघर लागली आहे. दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांनी वर्धापन दिनाच्या समारोपाला लावणीचा फड आयाेजित करत अधिकाऱ्यांनी ठेका तर  धरलाच, पण ‘वन्स मोअर’च्या हाका दिल्या.  एकंदर परळीत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर चक्क साडेचार लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. प्रादेशिक विकासाच्या समताेलासाठी १९७१ मध्ये परळीत औष्णिक वीज निर्मिती केंद्र सुरू करून त्यात आठ वीज निर्मिती संच उभारण्यात आले. या आठपैकी सध्या १,२ व ३  क्रमांकाचे संच कायमचे बंद  असून  ४ ५,६,७ हे चार संच वीज निर्मितीसाठी सक्षम नसल्याने तसेच वीज मागणी अभावी दीड वर्षांपासून बंद आहेत. संच क्र. ८  मधून   वीज निर्मिती होत आहे. कोळसा व पाण्याची उपलब्धता मुबलक असतानाही दोन वर्षांत हे थर्मल कधीच पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. विशेष म्हणजे या औष्णिक वीज निर्मिती केंद्राने वीज उत्पादनात अनेक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मागील दोन वर्षांत या वीज केंद्रात एक एक संच बंद पडत गेले, याला कोण जिम्मेदार हा प्रश्न आहे. मर्जीतील गुत्तेदारांना अवास्तव बील वाढ करत कामे दिली जातात. अशा बोगस कामांमुळे वीज केंद्राची महाराष्ट्रात प्रतिमा डागाळली आहे.  एकीकडे राज्यातील कोराडी-खापरखेडा, पारस-चंद्रपूर या ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांमधून उत्पादित  वीज महावितरण कंपनी खरेदी करत आहे. परंतु परळीची वीज मात्र विकत घेतली जात नाही. पुण्याचा ऑर्केस्ट्रा नि लावणी

१५ नोव्हेंबरला वीज निर्मिती केंद्राचा ४८ वा वर्धापन दिन होता.  मुख्य अभियंता एन. ए. शिंदे व कामगार कल्याण अधिकारी एस. पी. वासुदेव यांनी लावणीसह पुणे येथील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम घेतला. परळी केंद्राला  घरघर करत असताना अधिकारी रविवारी रात्री लावणीचा बार उडवत होते. लावणी संपली की ‘वन्स मोअर’ची हाक देत होते.  विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी परळीसह जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना निमंत्रण दिले नव्हते. पुण्यातील व्यावसायिक कलाकारांना मोठे मानधन दिले गेले. बिल काढण्याची शक्कल 

परळी येथील वीज निर्मिती केंद्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित मनोरंजनाच्या  कार्यक्रमावर झालेला खर्च महाजनको  मंजूर करणार नाही हे अधिकाऱ्यांना पक्के माहीत असून त्यामुळे  परळी थर्मलमधील गुत्तेदाराला एखादे काम वाढवून देऊन किंवा बिलाच्या फरकातून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.वर्धापन दिन केंद्रस्थानी ठेवूनच कार्यक्रम  

वर्धापन दिनानिमित्त आम्ही स्थानिक कलाकारांसह क्रीडाप्रेमींचा सहभाग असलेले कार्यक्रम घेतले. समारोपाचा कार्यक्रम आम्ही मनोरंजनात्मक घेतला आहे. संपूर्ण कार्यक्रम बाहेरचा होता हे म्हणणे चुकीचे असून या सर्व कार्यक्रमांत आम्ही वर्धापन दिन केंद्रस्थानी ठेवला होता.
- एस. पी. वासुदेव, कार्यकारी कल्याण अधिकारी, औ. वि. केंद्र, परळी   

बातम्या आणखी आहेत...