आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अत्याचार राेखण्यास कायदे पुरेसे नाहीत, 'राक्षस' संपवण्यास हवी राजकीय इच्छाशक्ती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 'महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदे पुरेसे नाहीत. समाजातील राक्षस संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे,' असे परखड मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले. हैदराबाद आणि उन्नाव येथील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ते बाेलत हाेते.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते.

विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली, तर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांचा मानद डॉक्टरेट पदवी देऊन गाैरव करण्यात अाला. उत्कृष्ट परदेशी विद्यार्थी म्हणून टांझानियाच्या अँजेलिना फ्रान्सिस विलियम्स यांना कुलपती प्रा. मुजुमदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराच्या घटना झाल्या, त्या अतिशय निंदनीय आहेत. या घटना आपल्यापुढे आव्हाने निर्माण करीत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी हा भेदभाव आणि अत्याचार रोखण्याचे वचन दिले पाहिजे. निर्भया प्रकरणात आम्ही कठाेर कायदा अाणला. पण प्रश्न सुटले का? मी कोणत्याही कायद्याच्या विरोधात नाही, मात्र समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे अाहे. त्यासाठी संस्कृती आणि इतिहासाचा आधार घेण्याची नितांत आवश्यकता अाहे,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण घेण्यासाठी जात, लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करून देते. भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा 'वसुधैव कुटुंबकम्'चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहनही नायडू यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी पॅशनने नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचा सल्ला डॉ. मुजुमदार यांनी दिला. कामात मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असेही डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.

सिम्बायोसिस विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना मानद डाॅक्टरेट देऊन गाैरवण्यात अाले. या वेळी उपस्थित राज्यपाल कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ.

अायुष्यभर चांगले काम करत राहीन : अख्तर

जावेद अख्तर म्हणाले, 'शिक्षण मानवाला समृद्ध करते. लोकशाही आणि मानवाधिकारात शिक्षणाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. देशातला समृद्ध करण्यासाठी शिक्षण हे भविष्य आहे', असे सांगत अख्तर यांनी मानद डाॅक्टरेट दिल्याबद्दल सर्वांचे अाभार मानले. या सन्मानाची प्रतिष्ठा जपत आयुष्यभर चांगले काम करीन. मी शेजारच्या शहरात म्हणजेच मुंबईत राहत असल्याने मला कधीही बोलवा, मी सदैव तत्परतेने हजर राहीन, अशी ग्वाहीही त्यांनी सिम्बायोसिस विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिली.
 

बातम्या आणखी आहेत...