आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणेदोन कोटींची लाच घेताना वकिलाला अटक; जमीन प्रकरणाचा निकाल लावून देण्यासाठी मागितली लाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जमिनीच्या दाव्यासंदर्भात सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करणे आणि अर्जदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी एका वकिलाला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची लाच घेताना बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. येथील बंडगार्डन परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.


इतक्या मोठ्या रकमेची लाचखोरी पकडण्याची इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचा दावा करण्यात आला आहे. रोहित शेंडे असे या लाचखोर वकिलाचे नाव आहे. प्राथमिक तपासात शेंडे संबंधित विभागाच्या उपसंचालकाचा खासगी एजंट म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


पर्वती परिसरातील दीड एकर जागेसंदर्भातील सुनावणी दावा काही दिवसांपासून उपसंचालकांसमोर सुरू आहे. या प्रकरणी सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करणे आणि निकाल अर्जदाराच्या बाजूने लावून देण्याच्या बोलीवर शेंडे याने दोन कोटी लाचेची मागणी केली. त्यापैकी १ कोटी ७० लाख स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण म्हणाले, ‘टायटल क्लिअर करून देतो, निकालही तुमच्या बाजूने देतो, असे सांगून पैसे घेऊन या, असा निरोप शेंडे याने अर्जदाराला दिला. पैसे तयार असल्याचे कळताच, मूळ दाव्याचा निकाल लागलेला नसतानाही शेंडे याने अंतिम सुनावणी करून तात्काळ शासकीय सहीशिक्क्यांनिशी निकालाच्या आदेशाची प्रतच तयार केली. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेंडेच्या कार्यालयात गेला आणि हा निकालही तेथेच तयार करण्यात आला. अर्जदाराने आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असल्याने पथकाने बंडगार्डन परिसरात सापळा रचला आणि शेंडे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याचा जबाब नोंदवण्यात येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...