आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टातील किस्से

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तेव्हा रेल्वे विभागात अस्थायी कर्मचारी म्हणून कार्य करीत होतो. रात्री आठ वाजेची गाडी निघून गेली होती. माझ्या वडिलांनी माझ्याकडे रेल्वेची कॅश तिजोरीत जमा करण्यासाठी दिली आणि ते घरी निघून गेले. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता गाडी होती तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे मी स्टेशनामध्येच झोपत असे. रात्रीचे नऊ वाजले असतील, तेवढ्यात साहेबांसोबत तीन-चार पोलिस आणि माझा परिचित माणूस समोरच उभे होते. मी घाबरूनच दार उघडले. पोलिसांनी सांगितले, हा धन्नू राऊत नाव सांगतोय, याने दारू गाळण्याची भट्टी लावली होती. आम्ही पंचनामा केला आहे. साक्ष म्हणून तुमची स्वाक्षरी हवी. मला काही सुचेना. पोलिस आरोपीला साहित्यासह घेऊन गेले. मी सर्व घटना वडिलांना सांगितली. ते म्हणाले, अरे बाबा, धन्नू हा गरीब माणूस आहे तू त्या भानगडीत पडायला नको होते. मी गांगरून गेलो. आणि... तीन चार दिवसांनी धन्नू मला भेटायला आलाच.
घडलेल्या प्रकाराची मीच उजळणी केली. अर्थात तोही निर्ढावलेला होता. त्याने मला सांगितले, दुस-या दिवशी गावात येऊन भेट. पहिल्यांदा मला भीती वाटली, हा आपणास मारणार तर नाही? पण सत्य नंतर समजले. त्यानेही वकील ठरवला होता. त्यांनी मला कागदावरची माहिती वाचून दाखवली. तसेच तुम्ही पंचनाम्यावर किती वाजता सही केली ते सांगा? असे विचारले. ठरल्याप्रमाणे मला कोर्टात ओळख परेडसाठी बोलावले. प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. आपण धन्नू गणाजीला ओळखता का? मी लगेच म्हणालो, हो गेल्या सहा महिन्यांपासून शेतीची रखवाली करीत असून रिकाम्या वेळात तो माझ्याशी गप्पा-गोष्टी करत असतो. घटनेच्या दिवशी काय घडले, तेही सांगितले. तसा आरोपीचा वकील पुढे होत म्हणाला, रात्री 8.30 वाजता आरोपी ऑफिसमध्ये होता, तो किती वाजता बाहेर गेला हे मला सांगता येणार नाही. त्या वकिलाने सर्व काही फोल ठरवले आणि धन्नू राऊत निर्दोष सुटला. आजही तो मला हितचिंतक मानतो.