आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एडिनबर्ग- जगभरात नववर्षाचा पहिला आठवडा संपत असतानाही अनेक ठिकाणी जल्लाेष सुरूच आहे. यात स्काॅटलंड हा देश एक पाऊल पुढे जात वेगळ्या प्रकारे नववर्षाचा जल्लाेष साजरा करत आहे. आगामी मार्चमध्ये ब्रेक्झिट हाेणार आहे. त्यामुळे ब्रेक्झिटशिवाय युराेपातील नागरिकांमध्ये जवळीक कायम राहावी म्हणून राजधानी एडिनबर्गमध्ये प्रेमसंदेश दिला जात आहे. 'लव्हलेटर्स टू युराेप' नावाच्या या उपक्रमात सहा इमारतींवर ऑडिओ-व्हिज्युअल लेसर शाेच्या माध्यमातून प्रेमाचा संदेश दिला जात आहे. हा शाे आगामी २५ जानेवारीपर्यंत राेज रात्री चालणार असून, त्यात स्काॅटलंडशी संबंधित सहा साहित्यिकांचे प्रेमसंदेश आहेत. त्यात पत्रकार-साहित्यिक चित्रा रामास्वामी, मूळच्या बल्गेरियातील कवयित्री कपका कसाबाेवा, साहित्यिक विल्यम डेलरिंपल, ब्रिटिश लेखिका लुईस वेल्स, नाट्यलेखक स्टेफ स्मिथ व विल्यम लेटफाेर्ड यांच्या प्रेमसंदेशांचा समावेश आहे.
स्काॅटलंडची पाळेमुळे युराेपातच आहेत : डेलरिंपल
स्काॅटलंडचे लेखक व इतिहासकार विल्यम डेलरिंपल यांचा संदेश आरजे मॅक्काेनेल यांनी कंपाेज केला असून, ताे ओल्ड टाऊनमधील ट्राेन किर्क येथे हा लेसर शाे सुरू आहे. 'स्काॅटलंडची पाळेमुळे युराेपातच रुजली आहेत. भलेही सर्व काही बदलेल; परंतु आमची संस्कृती नाही. हा बंधुभाव असाच कायम राहावा,' असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटलेय.
कवयित्री कसाबाेवा म्हणाल्या : प्रेम भीती दूर करण्याचे शस्त्र...
कवयित्री कपका यांच्या प्रेमसंदेशावरील शाे काल्टन हिलच्या नॅशनल माॅन्यूमेंट्स अाॅफ स्काॅटलंड येथे सुरू आहे. त्यांचा संदेश आहे. प्रेम हे मानवासाठी भीती दूर करण्याचे शस्त्र आहे. मी ते कडाक्याच्या थंडीत जळत्या मशालीसारखे घेऊन पुढे जात असते... लेखिका व रेडिओ प्रेझेंटेटर लुईस वेल्स यांनी 'स्काॅटलंडचे युराेपची संस्कृती व भाषेशी कसे नाते आहे' हे सांगितले आहे. त्यांचा प्रेमसंदेश समरहाॅलच्या टेक क्यूबमध्ये दाखवला जात आहे.
नाट्यलेखक स्टेफ स्मिथ यांचा प्रेमसंदेश शाे काऊगेटमधील बाेंगाे क्लबवर सुरू आहे. 'हल्ली मानवी नात्यांत दरी निर्माण हाेत असून, ती आपण काेणत्याही स्थितीत भरली पाहिजे' असा संदेश त्यांनी दिला आहे. कवी विल्यम लेटफाेर्ड यांचा संदेश लीथ ग्रंथालयावरून दिला जात आहे. 'तरुण असताना इटलीने मला स्वीकारले हाेते. आज आपण सर्वांनी तिचा स्वीकार करण्याची गरज आहे,' असे स्मिथ यांनी त्यांच्या प्रेमसंदेशात म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.