आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीत विराेधी नेते गाेतबया राजपक्षे विजयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे - श्रीलंकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विराेधी पक्षातील नेते गाेतबया राजपक्षे विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजित प्रेमदास यांचा १३ लाखांहून जास्त मतांनी पराभव केला. राजपक्षे यांना ५२.२५ टक्के मते (६ लाख २४ हजार २५५ मते) पडली, तर प्रेमदासा यांना ४१.९९ टक्के (५ लाख ५६ हजार २३९) मते पडली. रविवारी निवडणूक आयाेगाने ही माहिती जाहीर केली.मावळते राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची जागा आता ७० वर्षीय राजपक्षे घेतील. या निकालानंतर राजपक्षे यांनी विजयाचा आनंद शांततेच्या मार्गाने साजरा करावा, असे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. प्रेमदासा (५२) यांनी सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशात २६९ जण ठार झाले हाेते. त्यामुळे राजपक्षे यांच्यासमाेर पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. देशात हिंदू व मुस्लिम समुदाय एकूण लाेकसंख्येच्या २० टक्के आहे. सर्व समुदायाला साेबत घेऊन वाटचाल करण्याचेही आव्हान त्यांच्यासमाेर असेल.  लिट्टेसाेबतचा संघर्ष संपुष्टात आल्यानंतर राजपक्षे यांच्यावर मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचे आराेप झाले. ते त्यांनी फेटाळले हाेते. परंतु आॅक्टाेबरमध्ये त्यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केली. तेव्हा सर्वात आधी त्यांनी देशाच्या मानवी हक्क विषयक जबाबदारीशी बांधिलकी व्यक्त करून श्रीलंका पीपल्स पार्टीकडून (एसएलपीपी) उमेदवारी अर्ज दाखल केला हाेता. 

चीनसाेबतच्या मैत्रीत वाढ : 

गाेतबया राजपक्षे यांचे बंधू महिंद्रा यांच्या कार्यकाळात श्रीलंका-चीन यांच्यातील मैत्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. चीनने श्रीलंकेतील पायाभूत प्रकल्पांत माेठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात करून तेथील अनेक प्रकल्पांत रस घेतला. आता श्रीलंका चीनच्या जाळ्यात अडकल्याचा आराेप टीकाकार करू लागले आहेत. गाेतबया देखील आपल्या सत्ताकाळात चीनच्या समर्थनार्थ निर्णय घेतील, असे सांगितले जाते. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी यूएनपीने राजपक्षे यांना अमेरिकेचे नागरिकत्व असल्यावरून लक्ष्य केले हाेते. 

माेदींनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती निवडणुकीतील विजयाबद्दल गाेतबया यांचे अभिनंदन. श्रीलंका-भारत यांच्यातील संबंध आणखी दृढ हाेतील, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. गाेतबया यांनीही त्यांचे आभार व्यक्त करून लवकरच भेट हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.तीस वर्षे चाललेल्या गृहयुद्धातील हीराे अशी देशात ओळख 
 
श्रीलंकेत ३० वर्षे चाललेल्या गृहयुद्धातील नायक अशी गाेतबया राजपक्षे यांची प्रतिमा आहे. राजपक्षे जेवढे वादग्रस्त तितकेच सन्माननीय व्यक्तिमत्त्व म्हणून श्रीलंकेत आेळखले जातात. सिंहली समुदायातील ते लाेकप्रिय नेते आहेत. ७० वर्षीय राजपक्षे माजी सैनिक आहेत. २० जून १९४९ मध्ये मातारा जिल्ह्यात जन्मलेले राजपक्षे हायप्राेफाइल घरात जन्माला आले. वीस वर्षे त्यांनी लष्करात सेवा दिली हाेती. महिंद्रा राजपक्षे यांचे ते धाकटे बंधू हाेत. महिंद्रा हे २००५-२०१४ या काळात राष्ट्रपती पदावर हाेते. गाेतबया संरक्षण मंत्रिपदावर राहिले आहेत. मद्रास विद्यापीठात त्यांनी संरक्षण क्षेत्रासंबंधीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला हाेता. २०१२-१३ मध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून भारताचा दाैराही केला हाेता.