आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे माेठे नेते, त्यांच्या येण्याने शिवसेनेला फायदाच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील माेठे नेते अाहेत. त्यांनी शिवसेना संपवण्याचे नव्हे तर त्यांचा पक्ष वाढवण्याचे काम केले अाहे. त्यांनी पक्षवाढीसाठी घेतलेले परिश्रम माेठे असून, ते शिवसेनेत अाले तर त्याचा अामचा पक्ष विस्तारासाठी निश्चितच फायदा हाेईल. सर्व बाबी सकारात्मक असून, अंतिम निर्णय पक्षनेतृत्व घेईल, त्यापूर्वी माजी मंत्री सुरेश जैन यांची संमती घेऊनच पुढे जाणार असल्याचे मत शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. जळगाव दाैऱ्यावर अाले असता त्यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दात.

खडसे माेठे अाणि ताकदीचे नेते अाहेत. तात्त्विकदृष्ट्या ते शिवसेनेलाही जवळचे अाहेत. त्यांनी यापूर्वी घेतलेली भूमिका ही शिवसेना संपवण्यासाठी नव्हे तर त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी हाेती. त्यांच्या पक्षासाठी त्यांनी ते निर्णय घेतले. ते त्यांच्या पक्षासाठी प्रामाणिक हाेते. ते उद्या शिवसेनेत अाले तर त्याच तिडकीने अामचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांचा शिवसेनेला निश्चितच फायदा हाेईल. त्यांच्या उघड निर्णयापेक्षा गेल्या पाच वर्षांत भाजपकडून कार्यकर्त्यांना झालेला त्रास अधिक अाहे. या लाेकसभा अाणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या इतर लाेकांकडून झालेला त्रास अाम्ही विसरू शकत नाही. म्हणून खडसेंचे अाम्हाला वावडे नाहीच.

मुख्यमंत्रिपदावरून भाजपने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना खाेटे ठरवले हाेते. या विषयावरून अाम्ही भाजपसाेबत न जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात त्या विषयाची सुरुवात अाधीच झाली हाेती. निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने सर्वताेपरी प्रयत्न केले.

विराेधकांपेक्षा अाम्हाला त्यांच्यासाेबत लढतच वेळ घालवावा लागला. त्यामुळे भाजपसाेबत जाण्याची कुणाचीही मानसिकता नव्हती; परंतु शब्द युतीचा असल्याने अाम्ही साेबत हाेताे. युती ताेडण्याच्या निर्णयाचे शिवसैनिकांकडून स्वागतच झाले. अाता तीन पक्षाचे सरकार टिकणार नसल्याची टीका केली जाते; परंतु अाम्ही जागरूक असून, सावधगिरीने, सामंजस्याने पूर्ण ५ वर्षे सत्ता चालवू.

भाजपमध्ये सध्या भूकंप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील तीन पक्षांच्या अाघाडीचा निर्णय घेतला अाहे. सत्तेचे केवळ १५ दिवस झाले असताना भाजपमध्ये भूकंप हाेत अाहेत. सत्ता अाल्याने भाजपतील अनेक लाेक विचार करीत अाहेत. त्यामुळे अामची तीन पायाची सत्ता तर कायम असेल; परंतु भाजपचे काय नुकसान हाेईल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याने अाता पक्षवाढीकडेच आमचे लक्ष

सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याने अाता पक्षवाढीकडे लक्ष दिले जात अाहे. त्यासाठीच जिल्ह्यात अालाे अाहे. खडसे याच जिल्ह्यातील असल्याने साहजिकच त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू अाहे. मी स्थानिक पातळीवर अंदाज घेत अाहे. सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर हाेईल. पक्ष संघटनेच्या बाबतीत अामदार गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख अाणि अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली अाहे. माजी मंत्री सुरेश जैन हे येथील नेते अाहेत. त्यांना विचारूनच संघटना अाणि इतर बाबतीत निर्णय घेतले जातील. खडसे अामच्याकडे अालेच तर तेही त्यांच्या संमतीनेच येतील. अामदार चंद्रकांत पाटील यांचीही काेणतीही अडचण नाही. खडसेंना घ्या हे सर्वप्रथम त्यांनी सांगितले अाहे. या निवडणुकीत जळगाव शिवसेनेने शंभर टक्के यश मिळवले अाहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला बाेनस मिळेल हे निश्चित अाहे. चांगले मंत्रिपद जिल्ह्याला मिळेल, शिवाय महामंडळ अाणि अन्य ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न असेल.
 

बातम्या आणखी आहेत...