मुंबई / नेतृत्वहीन काँग्रेसचाही आता शरद पवार यांच्या करिष्म्यावरच 'भरवसा'

काळाचा महिमा काँग्रेसची प्रथमच १२५ एवढ्या कमी जागा लढवणार

Sep 23,2019 07:55:00 AM IST

मुंबई : २०१४ ची लाेकसभा व विधानसभा तसेच २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. त्यानंतर अनेक दिग्गज नेतेही पक्ष साेडून गेले. त्यामुळे दाेन्ही पक्ष गलितगात्र झाले आहेत. काँग्रेसकडे तर सक्षम नेतृत्वच उरले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मात्र वयाच्या ७८ व्या वर्षीही पुन्हा मैदान मारण्याच्या जिद्दीने राज्यभर फिरत आहेत. राष्ट्रवादीत नेते राहिले नसले तरी राज्यात पवारांना मानणारा माेठा वर्ग आहे. काँग्रेसमध्ये तशी लाेकप्रियता असणारा नेताच राहिलेला नाही. त्यामुळे नाइलाजाने का हाेईना आगामी विधानसभा निवडणुकीत पडते घेत अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवण्यावर काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व तयार झाल्याची माहिती आहे. म्हणूनच ६० वर्षांत आजवर कधीही एवढ्या कमी जागा लढवल्या नसल्या तरी राष्ट्रवादीशी तडजाेड करून १२५ जागा लढवण्याची तडजाेड त्यांना करावी लागत आहे. राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'दिव्य मराठी'कडे ही कबुली दिली.


काँग्रेसला साेडचिठ्ठी देऊन शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. तेव्हापासूनच पवारांच्या खच्चीकरणाची एकही संधी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व साेडत नव्हते. २०१० मध्ये तर केवळ याच उद्देशाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवले. चव्हाणांनीही चाेख कामगिरी बजावत राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यातील गैरकारभार चव्हाट्यावर आणले. परिणामी दाेन्ही काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले हाेते.


शरद पवारांचे वलय अजूनही कायम
'खरे तर काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यासारखे माेजकेच बडे नेते पक्ष साेडून गेले आहेत. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसमधून मात्र दिग्गज नेत्यांची फाैज बाहेर पडली. तरीही काँग्रेसने जागावाटपात तडजाेड का स्वीकारली?' या प्रश्नावर काँग्रेसचा ज्येष्ठ नेता म्हणाला, 'अजूनही काँग्रेसकडे पारंपरिक व्हाेट बँक आहे, मात्र ती आकर्षित करील असा नेता नाही. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेते व व्हाेट बँक राहिली नसली तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना मानणारा माेठा मतदार वर्ग अजूनही आहे. ताे आकर्षित करण्यासाठी स्वत: पवार या वयातही राज्यभर फिरत आहेत. सरकारविराेधात वातावरणनिर्मिती करत आहेत. त्यांच्याशी आघाडी केली तरच काँग्रेसला चांगले यश मिळू शकते, असे सोनिया गांधी यांना वाटते. पक्ष साेडलेले दाेन नेते (विखे व हर्षवर्धन पाटील) हे काँग्रेसमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या धाेरणामुळेच भाजपत गेले याकडेही या नेत्याने लक्ष वेधले.


२००९ : राष्ट्रवादी ११३, काँग्रेस १७० जागी लढली
राष्ट्रवादीशी आघाडी झाल्यापासून काँग्रेस नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली. २००४ मध्ये जेव्हा आघाडी झाली तेव्हा काँग्रेसने १५७, तर राष्ट्रवादीने १२४ जागा लढवल्या होत्या. २००९ मध्ये काँग्रेसने आपल्या जागांची संख्या वाढवून १७० केली व राष्ट्रवादीला ११३ जागा दिल्या.


पवारांसाेबत संयुक्त सभा घेण्यावर असेल भर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते संयुक्त प्रचार सभा घेण्यावर भर देणार आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख वक्ते असतील. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात, अशाेक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचीही उपस्थिती असेल.


२०१४ : स्वबळावर लढा, आता पुन्हा आघाडी केली
२०१४ ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढली होती. आता २०१९ मध्ये पुन्हा आघाडी झाली आहे. या वेळी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी समान म्हणजे १२५-१२५ जागा लढत आहेत. याचा अर्थ काँग्रेसने आपल्या कोट्यातील जवळजवळ ४५ जागांवर पाणी सोडले आहे.

X