आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीचा सोहळा, भाजपची औपचारिकता; 282 आमदारांना शपथ, दाेन जण गैरहजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल महिनाभराने नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला बुधवारी 'मुहूर्त' लागला. एकूण २८८ पैकी २८२ आमदारांनी विधानसभेत, तर चाैघांनी हंगामी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेतली. भाजपाचे सुधीर मुनगुंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार मात्र अनुपस्थित हाेते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांच्या चेहऱ्यावर हास्य हाेते, तर भाजपचे आमदार केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्याचे दिसले. त्यांनी शपथविधी करून लगेच काढता पाय घेतला.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास काेळंबकर यांनी नवनर्वाचित आमदारांना शपथ दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून बसने थेट विधानभवनात आले होते. शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सर्वपक्षीय आमदारांचे प्रवेशद्वारातच हसतमुखाने स्वागत करत होत्या. घरातील एखाद्या मंगलकार्याप्रमाणे त्यांचा वावर हाेता. सुरुवातील ज्येष्ठ सदस्य, नंतर महिला व अखेरीस नवीन आमदारांना शपथ देण्यात आली. ११ वाजून २० मिनिटांनी राष्ट्रगीताने कामकाज स्थगित करण्यात आले.

निवडणूक निकालाच्या तब्बल एक महिन्यानंतर शपथविधीस 'मुहूर्त'

उद्धव ठाकरे हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ ठरवले जाईल. या सरकारला ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिलेली आहे, अशी माहिती हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी दिली. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सहा महिन्यांत उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे लागेल.

ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य विधानसभेत

आजवर ठाकरे कुटुंबीय 'माताेश्री'वरून राजकारण चालवायचे. मात्र, यंदा प्रथमच आदित्य यांच्या रूपाने पहिला ठाकरे विधानसभेत पाेहाेचला. आता मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेही विधिमंडळात दिसतील. त्यांच्यासाेबत अजित पवार-राेहित पवार, अमित देशमुख- धीरज देशमुख हे एकाच कुटुंबातील सदस्यही सभागृहात दिसणार आहेत.

मी राेहित सुनंदा राजेंद्र पवार... आई-वडिलांचे नाव घेत शरद पवारांच्या नातवाची शपथ

शरद पवारांचे नातू राेहित यांनी शपथ घेताना 'मी राेहित सुनंदा राजेंद्र पवार' अशी सुरुवात केली. तर, ६६ आमदारांना सार्वभौमत्व हा शब्द नीट उच्चारता आला नाही. चौथी टर्म असणाऱ्या एका आमदाराला शपथ वाचता येत नव्हती. त्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन शपथ घेतली. कोणी ईश्वरास, कोणी अल्लाहला, तर कोणी मातृसाक्षीने शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय कोकण, जय मुंबई, जय विदर्भ याचा जयघोषही काहींनी केला. शिवसेनेच्या काही आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला.
शपथविधीस आलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत हाेता.

अजितदादांचा वावर, जणू काही झालेच नव्हते

राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी हातमिळवणी करत औटघटकेचे उपमुख्यमंत्रिपद मिळवलेले अजित पवार यांनीही विधानसभेची शपथ घेतली. विधिमंडळ परिसरात वावरताना 'जणू काही घडलेच नाही' अशा आविर्भावात वावरताना ते दिसले. माध्यमांनाही ते 'मी राष्ट्रवादीतच आहे' एवढेच सांगत हाेते. काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार शपथ घेतल्यानंतर पवार यांच्याकडे येत होता. ते देखील त्यांना प्रतिसाद देत होते. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अगदी समोरच अजित पवार आणि जयंत पाटील बसले होते. पाटील आणि अजित पवार हास्यविनोदात रंगला होते. फडणवीसांची नजर मात्र स्थिर नव्हती. 'अजितदादांबाबत याेग्य वेळ आल्यावर बाेलेन' एवढेच फडणवीसांनी माध्यमांना सांगितले.

चार आमदारांचा दालनात शपथविधी

भाजपचे राम कदम, काँग्रेसचे लखन साजा मलिक, एमआयएमचे इस्माईल शेख आणि महेश वालदे यांनी हंगामी अध्यक्षांच्या दालनात सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांना पुढील सहा महिन्यांत शपथ घेता येईल.
 

बातम्या आणखी आहेत...