आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विधिमंडळात आज कार्यकर्तृत्व संस्मरण व्याख्यान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीयमंत्री, थोर नेते डॉ. शंकरराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे थोर नेते, सहकारमहर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजारामबापू पाटील व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रफीक झकेरिया यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अाज बुधवारी (दि. ११) सायंकाळी ४.०० वाजता, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे या महनीय नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण करणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य शरद पवार असतील, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री िवराज पाटील, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेतील विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान सभेतील विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब यांच्यासह विविध राजकीय पक्षनेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या चारही महनीय नेत्यांच्या कुटुंबियांना या कार्यक्रमासाठी विधिमंडळातर्फे विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. या महनीय नेत्यांच्या विधिमंडळातील तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे साक्षीदार असलेले राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी माधवराव गोडबोले व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे त्यांच्यासमवेतच्या विविध आठवणींना आणि कार्याला उजाळा देतील.

तसेच व्यासपीठावरील मान्यवर ज्येष्ठ नेतेमंडळी या महनीय नेत्यांच्या प्रदीर्घ मान्य राजकीय कारकीर्दीतील महत्वाच्या घटनांचा मागोवा घेतील. महाराष्ट्रातील सर्व जनतेला हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम बघता यावा, यादृष्टीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेन्द्र भागवत आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...