आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Leave A Meal For Ten Rupees; Shiv Sena Should At Least Give Vadapav At Two Rs

दहा रुपयांत जेवण राहू द्या, शिवसेनेने दाेन रुपयांत किमान वडापाव तरी द्यावा - सुप्रिया सुळे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : निवडणुका आल्या की शिवसेनेला जनतेचा कळवळा येत असल्याचे दिसते. मात्र गेली पाच वर्षे सत्तेत असताना जनहिताच्या अशा याेजना त्यांनी का सुरू केल्या नाहीतॽ माझ्या मतदारसंघात 'ताईज किचन' माध्यमातून पुण्यातील धनकवडी, सिंहगड राेड भागात अत्यल्प किमतीत भाेजन याेजना आम्ही अनेक वर्षांपासून राबवत आहाेत. आमचे पुण्यातील नगरसेवक दत्ता धनकवडे दहा रुपयांत गर्भवती महिलांची वैद्यकीय तपासणी ते डिलिव्हरी करून देतात. दुसरे नगरसेवक विशाल तांबे पाच रुपयांत वर्षभर वैद्यकीय तपासणीची सुविधा देतात. अशा सुविधा युती सरकारला यापूर्वी कधी उपलब्ध करून देता आल्या नाहीत. आता निवडणुकीच्या ताेंडावर १० रुपयांत जेवणाची थाळी देण्याची घाेषणा करणाऱ्या शिवसेनेने दाेन रुपयांत वडापाव तरी उपलब्ध करून द्यावा,' असा खाेचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. 'दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बाेलत हाेत्या.

प्रश्न : आजारपणामुळे तुम्ही काही दिवसांपासून प्रचारापासून दूर हाेतात? आता सक्रिय झालात का?
सुळे : डेंग्यूमुळे मी अाराम करत हाेते. आता डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रचारात सक्रिय हाेईन. तूर्त सासवड, भाेर, दाैंड या भागात मी सभा घेतल्या. सत्ताधाऱ्यांपेक्षा आघाडीचा प्रचार राज्यात व्यवस्थित सुरू आहे. राज्यात आघाडीचा परफाॅर्मन्स चांगला असेल. राज्यात मी अद्याप फिरलेली नसल्याने नेमक्या किती जागा निवडून येतील हे आताच सांगता येणार नाही.

प्रश्न : आघाडीनंतर दाेन्ही पक्षांतील बंडखाेरी उफाळून आली, त्याचा कितपत फटका बसेल?
सुळे : बंडखाेरी तर सर्वच पक्षांत आहे. मात्र भाजपत ती जास्त आहे. त्यामुळे त्यांना अधिक फटका बसेल.

प्रश्न : युवा नेते राेहित पवार यांच्या नेतृत्वाविषयी काय सांगाल?
सुळे : राेहितने दाेन वर्षे आधीच निवडणुकीची तयारी सुरू केली हाेती. समाजकारणात तर ताे अनेक वर्षांपासून काम करत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचा त्याने अभ्यास केला. लाेकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. ताे एक आदर्श आमदार म्हणून काम करेल. पार्थच्या निवडणुकीची तुलना राेहितशी करता येणार नाही, कारण प्रत्येक निवडणूक वेगळी असते.

प्रश्न : मुख्यमंत्री म्हणतात, आता विराेधकच राहणार नाहीत?
सुळे : लाेकशाहीवर विश्वास ठेवणारे आम्ही लाेक आहोत. लाेकशाहीत दाेन वेगवेगळया विचारांच्या लाेकांत चर्चा झाली पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांना बहुधा ते मान्य नाही. मुख्यमंत्री पाच वर्षांत काेणतीच ठाेस कामे करू न शकल्याने कलम ३७० चा मुद्दा राज्याच्या निवडणुकीत मांडून मते मागत आहेत.

प्रश्न : भाजपत इनकमिंग वाढतंय.. कशामुळे?
सुळे : 'पार्टी विथ डिफरन्स' असे सांगणाऱ्या भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार आयात आहेत. या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आराेप आहेत. अमित शहा एकीकडे सांगतात घराणेशाही बंद करा आणि स्वत:च्या पक्षात ५० टक्के घराणेशाही चालवतात.

प्रश्न : आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा नेमका दावेदार काेण?
सुळे : निवडणुकीनंतर ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल.

प्रश्न : चंद्रकांत पाटील पवार कुटुंबीयांना सातत्याने टार्गेट का करतात?
सुळे : केवळ चंद्रकांत पाटीलच नाही तर अमित शहा, मुख्यमंत्री हेसुद्धा पवार कुटुंबावर सातत्याने आराेप आणि टीका करतात, कारण त्याशिवाय त्यांची पेपरची हेडलाइन हाेऊ शकत नाही. पुण्यातील काेथरुडमध्ये एका कार्यक्षम महिला आमदाराचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी स्वत: लढत आहेत, याचे ख्ूप वाईट वाटते.

प्रश्न : 'आरे'मध्ये एका रात्रीत माेठ्या प्रमाणात झाडे कापली, शिवसेना या मुद्द्यावर गाेंधळलेली दिसते?
सुळे : शिवसेनेची आरेबाबत दुटप्पी भूमिका आहे. सत्तेत आल्यावर आम्ही कारवाई करू, असे ते सांगतात. मात्र, सध्याही तेच सत्तेत असल्याचे विसरतात. सामान्य मुंबईकरांना शिवसेनेने फसवले आहे. मुंबईत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असून त्यांचा एकही नेता साधी रुग्णालये अद्ययावत करू शकला नाही.

प्रश्न : राज्यातील महिला सुरक्षित आहेत असे तुम्हाला वाटते का?
सुळे : महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा गंभीर बनली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती वाईटच आहे. अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत हे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरूनही स्पष्ट हाेत आहे. सत्ता कुणाचीही असली तरी आजवर महाराष्ट्राची संस्कृती प्रगतीशील राहिली आहे, पण त्यालाच आता धाेका पाेहोचत आहे.