Political / राष्ट्रवादी काँग्रेसला आता सोडा; वंचित आघाडीला विधानसभेला बरोबर घ्या, विदर्भातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी

मातंग समाज भाजपचा हक्काचा मतदार झाला आहे. त्याला पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसची खेळी - अजित केसराळीकरांचा दावा 

विशेष प्रतिनिधी

Jun 09,2019 09:58:45 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघडउघड काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीशी काडीमोड घ्या आणि वंचित बहुजन आघाडीला बरोबर घ्या, अशी आग्रही मागणी विदर्भातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.


परळ येथील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शनिवारी विदर्भातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच लोकसभा निवडणुकीतील कामांचा लेखाजोखाही घेतला. त्यावेळी विदर्भातल्या बहुतेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेण्याची मागणी केली. विदर्भात राष्ट्रवादीचे विशेष संघटन नाही, तसेच अनुसूचित जातीचे मतदान पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. त्यामुळे वंचितला बरोबर घेतल्यास आगामी विधानसभेत काँग्रेस कमबॅक करेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.


प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी अधिक संख्येने आहेत. मात्र, म्हणून राष्ट्रवादी बरोबरची आघाडी तुटेल असे अजिबात नाही. आमची आघाडी विधानसभेला राहीलच. काँग्रेससाेबत येण्याचा निर्णय अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घ्यायचा आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.


अण्णाभाऊंची आठवण
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष धुमधडाक्यात साजरी करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. १ आॅगस्ट सुरू होणाऱ्या साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रदेश काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रम घेणार आहे.


चर्मकार समाज शिवसेनेकडे, बौद्ध धर्मीय वंचित, काँग्रेस व बसपकडे आणि मातंग समाज भाजपकडे अशी राज्यातील अनुसूचित जातीची राजकीय विभागणी झालेली आहे. राज्यात मातंगाचे तीन विद्यमान आमदार आहेत. त्यातील एक राष्ट्रवादीचा असून दोन भाजपचे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लातूर लाेकसभा मतदारसंघातून मातंग समाजाचा उमेदवार दिला होता.

मातंग समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न

राज्यात ३० लाख लोकसंख्या असलेला मातंग समाज भाजपचा हक्काचा मतदार झाला आहे. त्याला पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसची ही खेळी आहे, असा दावा मातंग समाज संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष अजित केसराळीकर यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मातंगांच्या कल्याणार्थ वस्ताद लहुजी साळवे आयोगाचे गठन केले, पण त्या आयोगाच्या शिफारशी मात्र लागू केल्या नव्हत्या. त्यामुळे मातंग समाज काँग्रेसपासून दूर झाला असल्याचा दावा केसराळीकर यांनी केला.

X
COMMENT