आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीसाठी नोकरीवर सोडले पाणी, शेतीपूरक व्यवसायातून प्रगती; शेतीपूरक अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

३५ एकरांवरील शेती. त्यातील २५ एकरांवर विविध प्रकारच्या फळबागा, देशी ५० हजार कोंबड्यांचे कुक्कुटपालन, ३ एकरांतील शेततळ्यात मत्स्यपालन, १ हजार विविध जातींच्या शेळ्यांचा फार्म, त्यासोबतच शेतीपूरक अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम. नेवासे तालुक्यातील देवी रांजणगाव शिवारातील खडकाळ माळरानावर कष्ट व जिद्दीतून उभा राहिलेला हा चैतन्याचा मळा शेतकरी वर्गास आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचा संदेश देत आहे.


देवी रांजणगाव शिवार म्हटले की खडकाळ, माळरान पण प्राथमिक शिक्षक अंकुश कानडे यांनी गेल्या सहा, सात वर्षांत या माळरानावर शेतीपूरक व्यवयासायातून प्रगतीही साधली. कानडे कुटुंबीय मूळ कुकाण्याजवळील अंतरवालीचे. पण स्वस्तात जमीन घेऊन काबाडकष्ट करत शेती कशी पिकवावी हे गणित त्यांना जमले. शेतीसाठी नोकरीवर पाणी सोडले. आज शेती परवडत नाही, नोकरीच हवी या मानसिकतेत असलेल्या युवा पिढीला मार्गदर्शक, असे काम कानडे यांनी शेतीतून उभे केले  आहे.


शेकडो एकर शेतजमीन पाण्याअभावी पडीक
कानडे यांनी दहा वर्षांपूर्वी बरड माळरान शोधले. ते विकत घेतले. टिकावाचा घाव घातला, तर खण्ण असा आवाज येणारे ते शेत. पण कानडे यांनी धीर सोडला नाही. आज या परिसरात शेकडो एकर शेतजमीन पडीक आहे. 


शेततळ्यातील ५ कोटी लिटर्स पाण्याने समृद्धी
प्रथम तीन एकर शेतजमिनीत दोन शेततळी तयार केली. यासाठी सुरुवातीचा खर्च लाखोंच्या घरात गेला खरा. पण तोच केलेला खर्च आज कोटींचे उत्पन्न देऊ लागला आहे. आज दुष्काळी परिस्थितीतही शेततळ्यातील ५ कोटी लिटर्स पाण्याने समृद्धी, तर आणलीच शिवाय हा चैतन्य फार्म शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक केंद्रच ठरत आहे.

 

शंभर कोंबड्यांपासून सुरुवात
अवघ्या दहा शेळ्या व शंभर कोंबड्यांपासून सुरू झालेला हा प्रयोग ५० हजार कोंबड्या व एक हजार विविध जातींच्या शेळ्यांवर पोहोचला आहे. तर दैनंदिन ४५ ते ५० हजार अंडी, तर महिनाभरात सात ते आठ लाख फक्त अंडीच विकली जात आहेत. 

 

बहुविध पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर करावा
माझ्याकडे २५ एकर क्षेत्रावर फळबागा आहेत. यामध्ये डाळिंब, पेरू, आंबा आदी फळबागांचा समावेश आहे. सध्या शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे. त्यामुळे तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच प्रकारचे पीक न घेता बहुविध पद्धतीचा वापर करावा. शेतीबरोबर, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसाय सुरू करावेत. यातून एखाद्या पिकात जर नुकसान झाले, दुसऱ्या एखाद्या पिकांतून शेतकऱ्यांना नफा मिळतो  -अंकुश कानडे, शेतकरी, देवी रांजणगाव.

बातम्या आणखी आहेत...