आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनादेश यात्रा सोडून मुख्यमंत्री उदयनराजेंना घेऊन दिल्ली दरबारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश महाजनांसह उदयनराजे शुक्रवारी रात्री पुण्यातून विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. - Divya Marathi
मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश महाजनांसह उदयनराजे शुक्रवारी रात्री पुण्यातून विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.

सातारा : राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या अनेक चर्चा-उपचर्चा झाल्यानंतर अखेर साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करत असल्याची माहिती खुद्द उदयनराजे यांनी ट्विटरवरून दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेतून काही वेळ बाजूला काढत उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशासाठी दिल्लीत डेरेदाखल झाले. ते स्वत: पुण्यातून रात्री विमानाने उदयनराजेंना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. शनिवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचा राजीनामा व लगेचच भाजपप्रवेश असा कार्यक्रम आहे.

आपले हेच प्रेम व आशीर्वाद माझ्या पाठीशी अविरत राहू द्या : उदयनराजे
उदयनराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करून 'आपण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीस मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत भाजप प्रवेश करत आहोत. आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहील अशी अपेक्षा आहे. आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.'
 

शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी अपयशी
गुरुवारी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पुणे येथे चर्चा केली होती. त्यांनी राष्ट्रवादी सोडू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी, खा. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांची मनधरणी केली. पण उपयोग झाला नाही. सातारचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले हेही भाजपात सामील होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
 

रामराजेंचा निर्णय अजून गुलदस्त्यातच, शरद पवारांना न दुखावण्याची ग्वाही
सातारा : शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी फलटणमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांचा काैल जाणून घेतला. या मेळाव्यात पक्षांतराबाबत काेणताही ठाेस निर्णय घेण्यात आला नसला तरी शरद पवारांना न दुखावता सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आपण भावनेने नव्हे तर हिमतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही निंबाळकरांनी दिली. 'आपण नगराध्यक्ष, आमदार, मंत्री आणि सभापती या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलो आहाेत. आता पदाची अपेक्षा नाही. मात्र या जिल्ह्याचे नुकसान करणारे जे लाेक आहेत त्यांना जिल्ह्याबाहेर घालून यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून आदर्श जपणारा जिल्हा अशी साताऱ्याची अाेळख निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,' असे ते म्हणाले. केवळ सत्तेसाठी पक्ष ही संकल्पना आपल्याला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर करणे टाळले. 'पूर्वीपासूनच शरद पवार हाच आमचा पक्ष हाेता. त्यांच्याबद्दल कधीही वेडेवाकडे बोललो नाही, बोलणार नाही. त्यांच्याविषयी कुठेही नाराजी ठेवून किंवा दूषणे देऊन कोठेही जाणार नाही. लाेकांमधील संभ्रमावस्था दूर करण्याबराेबरच जिल्ह्याच्या विकासात सक्रिय राहणार आहाेत,' असेही ते म्हणाले. केवळ साताऱ्याच्या नव्हे तर राज्याच्या विकासाचा आम्ही विचार करताे. जातीपातीपलीकडे इथे सत्ता राबवली गेली पाहिजे, अशी आपली धारणा असून त्यासाठी आपला संघर्ष सुरू असल्याचे सांगत तो सुरूच असल्याचे रामराजे म्हणाले.

योग्य लोकांकडे सत्तेची सूत्रे हवीत : संजीवराजे
'गेल्या २५ वर्षांत शेतीला पाणी, औद्योगिक विकासासाठी प्रयत्न केले. कारखाना, दूध संघ वगैरे संस्था पुन्हा उभ्या केल्या. आता सत्तेच्या माध्यमातून या विकासाची धूळधाण होणार असेल तर योग्य निर्णय घ्यावा लागेल. जिल्हा बँक, जिल्हा परिषद व तत्सम संस्थांच्या माध्यमातून उभी राहिलेली यंत्रणा अबाधित ठेवण्यासाठी सत्तेची सूत्रे योग्य लोकांकडे असली पाहिजेत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,' असे संजीवराजे निंबाळकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...