आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वेचे लेनिनग्राड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या घडीला हिंदी भाषिक प्रदेशात कम्युनिस्टांचे हातावर मोजता येतील एवढे जे काही गड आहेत त्यापैकी एक शहर म्हणजे बेगुसराय. १९९५पर्यंत बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील ७ पैकी ५ विधानसभा मतदारसंघावर डाव्यांचाच कब्जा होता. पण ९०च्या मंडल-कमंडल राजकारणाने बिहारमध्ये भाजप, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांचे राजकारण पसरू लागले. तथाकथित उच्च-नीच जातीतला संघर्ष, उच्चवर्णीय जातींना मिळालेले आव्हान व धर्मांधता अशांनी बिहारचे राजकारण पुरते बिघडले त्यात बेगुसरायमधील डावी विचारधारा झाकोळत गेली. 


जातीपातीची व धर्माची उभी भिंत असलेल्या बिहारमध्ये बेगुसरायची ओळख तशी भिन्नच. कारण या शहराला लाभलेला वर्गसंघर्षाचा इतिहास. १९७१मध्ये या भागात उच्चवर्णीय भूमिहार जातीच्या धनाढ्य जमीनदारांच्या ताब्यातल्या जमिनी मिळाव्यात यासाठी कष्टकरी, शेतमजूरांनी उग्र आंदोलन उभे केले. या आंदोलनात शोषित जातीतले जसे मजूर उतरले होते तसे उच्चवर्णीय भूमिहार जातीचे शेतकरी, मजूरही सहभागी झाले. या आंदोलनातूनच चंद्रशेखर सिंह, सीताराम मिश्रा, राजेंद्र प्रसाद सिंह असे कम्युनिस्ट नेते जन्मास आले (हे तीनही नेते भूमिहार होते) व या भागांत लाल रंग मिसळून गेला. कष्टकरी, मजूर, गरीब शेतकऱ्यांच्या चळवळीने या शहराला आणखी एक ओळख दिली ती म्हणजे ‘पूर्वेचे लेनिनग्राड’. 

 

आजच्या घडीला हिंदी भाषिक प्रदेशात कम्युनिस्टांचे हातावर मोजता येतील एवढे जे काही गड आहेत त्यापैकी एक शहर म्हणजे बेगुसराय. १९९५पर्यंत बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील ७ पैकी ५ विधानसभा मतदारसंघावर डाव्यांचाच कब्जा होता. पण ९०च्या मंडल-कमंडल राजकारणाने बिहारमध्ये भाजप, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांचे राजकारण पसरू लागले. तथाकथित उच्च-नीच जातीतला संघर्ष, उच्चवर्णीय जातींना मिळालेले आव्हान व धर्मांधता अशांनी बिहारचे राजकारण पुरते बिघडले त्यात बेगुसरायमधील डावी विचारधारा झाकोळत गेली. आज मंडल-कमंडल राजकारणाची तिशी पुरी होत असताना देशभरातील डाव्यांनी आपली पूर्ण ताकद वापरून कन्हैय्या कुमार या जेएनयूमधल्या ३० वर्षीय विद्यार्थ्याला लोकसभा निवडणुकीत 

 

उभे केले आहे. कन्हैय्याच्या राजकारणातील अशा नाट्यमय प्रवेशाने बेगुसरायची निवडणूक देशभरात चर्चेची झालीच आहे पण ही निवडणूक भाजपचा कट्टर हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध डाव्यांचा भूक, गरीबी, बेरोजगारी, शेतीसमस्या या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारा राष्ट्रवाद अशी लढवली जात असल्याने या निवडणुकीतून जन्मास आलेले विचारमंथन भविष्यात देशाच्या नसले तरी बिहारच्या राजकारणाची दिशा बदलेल असे 
दर्शवणारे आहे.   

 

बेगुसरायच्या लढतीच्या मुळाशी देशाच्या बदलेल्या राजकारणाचाही एक संदर्भ आहे, तो म्हणजे डावी विरुद्ध उजवी विचारसरणी यांच्यातील सनातन वैर.  चार वर्षांपूर्वी कन्हैय्याच्या जेएनयूतील ऐतिहासिक भाषणाने भाजपच्या भांडवलस्नेही, जातीयवादी, धर्मांधवादी राजकारणाच्या विरोधात देशभरात एक मोठी लाट निर्माण झाली होती. या लाटेत ‘अँटी एस्टॅब्लिशमेंट’ ताकद लक्षात आल्याने भाजपने सर्वच पातळ्यांवरून कन्हैयाचे चारित्र्यहनन सुरू केले. त्याला देशद्रोही ठरवले गेले, त्याला आईच्या पैशावर जगणारा लाचार विद्यार्थी अशी निर्भर्त्सना केली. वयाची तिशी आली तरी काही काम न करता फुकट हॉस्टेलमध्ये राहून पीएचडी कशी करू दिली जाते असे प्रश्न विचारले गेले. कन्हैया कोणते कपडे, बूट वापरतो इथपासून त्याची गर्लफ्रेंड, त्याची जात, त्याच्या देशव्यापी दौऱ्यांचा खर्च असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. मुख्य प्रवाहातील मीडियाकडून होणारे हल्ले, त्याच्या देशभक्तीविषयी विचारले जाणारे स्वैर प्रश्न, सोशल मीडियातून त्याचे सातत्याने केले जात असलेले चारित्र्यहनन अशा वातावरणात कन्हैय्या मात्र अत्यंत आत्मविश्वासाने निवडणुकीला उभा राहिलेला दिसतो.

 

कन्हैयाची कम्युनिस्ट पार्टीकडून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्याने निवडणूक खर्चासाठी ऑनलाइन आवाहन केले आणि केवळ २४ तासांत देशाच्या कानाकोपऱ्यातून २५ लाख रुपये जमा झाले. कम्युनिस्ट पार्टीचा लोकवर्गणी जमा करण्यामागचा हेतू हा होता की, प्रतिस्पर्धी पक्ष हा श्रीमंत असल्याने या पक्षाकडून निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होणे साहजिकच होते, त्यात आपल्या पक्षाची प्रतिमा अधिक पारदर्शी, स्वच्छ दिसावी म्हणून त्यांनी लोकवर्गणीचा मार्ग स्वीकारला. यात नमूद करण्यासारखी महत्त्वाची बाब अशी की लोकवर्गणीत १०० रुपयांची मदत करणाऱ्यांची संख्या हजारोंनी आहे आणि त्यात महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे. पण कन्हैयाच्या उमेदवारीने केवळ बेगुसरायमध्ये हलचल निर्माण झालेली नाही तर त्याने देशभरातला सामान्य शेतकरी, मजूर, कष्टकरी, युवक, सर्व स्तरांतील सामान्य माणूस आपल्याकडे ओढून घेतलेला दिसून येतो.  बेगुसराय मतदारसंघातले वातावरण पाहण्यासाठी जेव्हा तेघडा या विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्यक्ष फेरफटका मारला तेव्हा अगदी पंजाबपासून कन्याकुमारीपर्यंत, महाराष्ट्रापासून आसाम-अरुणाचल-नागालँड राज्यातले विविध वयोगटांतले लोक कन्हैयाच्या प्रचारासाठी आलेले दिसले. यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होतेच पण कोणतीही स्पष्ट अशी राजकीय विचारधारा न मानणारे, कोणत्याही विचारधारेचे ओझे न बाळगणारे शेतकरी, तरुण-तरुणी, डॉक्टर, शिक्षक-प्राध्यापक, सरकारी-बिगर सरकारी आस्थापनात काम करणारे कर्मचारी, शोषित वंचितांच्या हक्कांसाठी जमिनीवर काम करणाऱ्या देशभरातल्या अनेक एनजीओमधील कर्मचारी, देशाच्या सेक्युलर राज्य घटनेवर नितांत श्रद्धा ठेवणारे, हिंदू-मुस्लिम सौहार्दाची आजच्या काळात गरज असावी असे मानणारे, मोदी सरकारच्या भांडवलवादी धोरणांतून देशात वेगाने पसरत असलेल्या विषमतेने भयभीत झालेले, दलित अत्याचाराची धग लागलेले, नोटबंदीच्या निर्णयाने बेरोजगार झालेले, मोदी सरकारच्या फॅसिस्टवादी राजकारणाचा उबग आलेली हजारो माणसं कन्हैयाच्या प्रचारात दिसून आली. एवढ्या प्रचंड समुहांचे व्यवस्थापन कम्युनिस्ट पार्टीला करणे अशक्य असल्याने प्रचारासाठी आलेल्या लोकांनी स्वत:ची जबाबदारी स्वत:च उचललेली दिसत होती.
 

बिहारच्या नजीक असलेल्या उत्तर प्रदेश, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांतील लोक अधिक उत्साहाने सामील झालेले दिसले. स्वयंप्रेरणेने ही मंडळी मिळेल त्या वाहनाने बेगुसरायमधील खेड्याखेड्यात पोहोचत होते. प्रत्येक घरात जाऊन मतदारांचे प्रबोधन करत होते. मतदान यंत्र कसे असते, त्यात आपले मत कसे नोंदवायचे इथपासून कन्हैयाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नेमके काय सांगितले आहे, कन्हैयाच्या स्वप्नातला भारत कसा असेल, कन्हैया लोकसभेत निवडून गेल्याने सर्वसामान्य मजूर, शेतकऱ्यांचे प्रश्न तो लोकसभेत कसे मांडेल अशा प्रकारचा एकूण प्रचार पोहचवला जात होता. त्याशिवाय सामाजिक-राजकीय प्रबोधनासाठी काम करणारी कलापथके, त्यांची पहाडी आवाजातील आवेशपूर्ण गाणी, नागरिकांच्या हक्कांविषयी, राज्यघटनेतील मूल्यांविषयी जाणीवा निर्माण करणारी पथनाट्ये अशा नेहमीच्या राजकीय प्रचारातून गायब झालेल्या गोष्टी कन्हैय्याच्या प्रचारात हटकून दिसत होत्या. कन्हैयाच्या निवडून येण्याने सामान्यांच्या जगण्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल, हक्कांची लढाई दिल्लीपर्यंत लढता येईल, आपले जगण्यामरण्याचे प्रश्न कन्हैय्या संसदेत विचारेल अशा भावनेतून हा सगळा माहोल व्यापून राहिलेला दिसला.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग व प्रतिसाद मिळाल्याने या लोकांची ऊर्जा केंद्रित व्हावी व कन्हैयाच्या प्रचारात सुसंगती असावी म्हणून जेएनयूतील विद्यार्थ्यांनी एक व्यवस्थापन टीम स्थापन केली. प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारी टीम, सोशल मीडिया व अन्य मीडिया हाताळणारी टीम, बेगुसरायच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत, पंचायतींमध्ये प्रचार पोहचवणारी टीम स्थापन करून हा प्रचार भाजपच्या प्रचारयंत्रणेला धक्का देणारा नक्कीच िदसून येत होता. या प्रचारयंत्रणेत बॅकऑफिसमध्ये काम करणारे रझा हैदर, झुनी ही जेेएनयूतील तरुणी, सतीश मुक्तलिफ ही मंडळी व त्यांना साह्य करणारे कन्हैयाचे मित्र, जेएनयूतील त्याचे सहकारी, प्राध्यापक वर्ग व देशभरातील असंख्य तरुणांनी गेले वर्षभर बेगुसरायमध्ये डेराच टाकलेला होता. बेगुसराय हा अतिमागास जिल्हा असला तरी येथे मोबाइल व इंटरनेट बऱ्यापैकी पोहोचले आहे. त्यामुळे सुमारे एक वर्षापासून या मंडळींनी गावागावांत जाऊन सोशल मीडियाशी थेट संबंध असलेल्या नागरिकांचा एक डेटा तयार केला. त्यांना पक्षप्रचाराशी जोडून घेतले. सुमारे अडीचशेहून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुप, अनेक फेसबुक पेज तयार केली. हा जिल्हा कम्युनिस्टांचा पूर्वीचा गड असल्याने प्रचारयंत्रणा टीमने २७५ पंचायतींमधील जिंकलेल्या व हरलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखियांशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गावातील, परिसरातील प्रश्नांची माहिती घेतली. या मुखियांपैकी कोणाला प्रत्यक्ष प्रचारात उतरवल्याने फायदा होईल, याची चाचपणी करून प्रचारयंत्रणेचे एक िडझाइन तयार केले. खुद्ध कन्हैयाने बेगुसराय मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. प्रत्येक गाव व गावातले घर असा त्याचा थेट प्रचार आहे. बिहारमधील जातीय समीकरणाच्या विरोधात तो बोलत आहे, जातीच्या बाहेर जाऊन आपल्या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे असे तो सांगत असतो. महिलांमध्ये त्याच्याविषयी क्रेझ आहे पण बेगुसरायचे जातीय समीकरण हा या निवडणुकीतला केंद्रबिंदू आहे.


बेगुसरायमधला भूमिहार मतदार हा गिरीराजसिंहांच्या बाजूने पूर्ण उभा नसला तरी तो कन्हैयामुळे विभागला गेला आहे. पण भाजपच्या मदतीला नितीश कुमार, रामविलास पासवान असे मातब्बर नेते आहेत तर राजदचे उमेदवार तन्वीर हसन यांच्याकडे दलित-मुस्लीम व्होटबँक आहे, ती तोडणे कन्हैयापुढचे खरे आव्हान तर आहे. केरळ सोडले तर डाव्यांचे देशभरातील अनेक किल्ले यापूर्वीच ढासळले आहेत. बेगुसरायमध्येच नव्हे, तर सबंध देशभरात कन्हैया हा डाव्यांसाठी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन आला आहे. त्यामुळे पूर्वेच्या या लेनिनग्राडला पडलेला वेढा कन्हैया मोडीत काढतो की डाव्यांची उरलीसुरली ताकदही गमावतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
लेखकाचा संपर्क - ९८१९२१८०४८
 

बातम्या आणखी आहेत...