आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात साडेचार वर्षांची चिमुकली ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी (जि. नाशिक)  - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात साडेचारवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या वर्षभरात बिबट्याने या परिसरात चौघांचा बळी घेतला आहे.     


वरखेडा रोड येथील मॅकडॉल कंपनीलगत  दीपक रामदास साळवे यांच्या शेतात मजूर काम करत होते. मजुरांसोबत असलेली गायत्री प्रकाश गांगुर्डे (आंबे, वरखेडा) ही साडेचार वर्षांची चिमुकली बाजूला खेळत असताना गव्हाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली व उसाच्या शेतात फरफटत नेले. गंभीर जखमी झालेल्या गायत्रीला अधिक उपचारासाठी  रुग्णालयात नेण्यात आले. परंतु,  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असून बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतात राहणारे नागरिक   मोठ्या प्रमाणात दहशतीखाली वावरत आहेत. वन विभागाने योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. यापूर्वी परमोरी येथेच एक चार वर्षांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. लखमापूरजवळील म्हेळुस्केत २ बालकांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पाच दिवसांपूर्वीच मातेरेवाडी येथील शेतकऱ्यालाही  बिबट्याने  गंभीर जखमी केले होते.    


पुण्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका 
पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे एका शेतातील उघड्या विहिरीत ६ महिन्यांचा मादी बिबट्या पडल्याची घटना बुधवारी घडली. वन विभागाच्या पथकाने तासाभराच्या अथक प्रयत्नांनी बिबट्याला पिंजऱ्यातून विहिरीबाहेर काढले.  उपचार केल्यानंतर रात्री त्याला जंगलात सोडण्यात आले. जुन्नर परिसरात मागच्या आठवड्यातही दोन बिबटे आढळले होते. त्यामुळे दहशत पसरली आहे. 

बातम्या आणखी आहेत...