एकलहरेत बिबट्याने आठ / एकलहरेत बिबट्याने आठ कोंबड्यांचा पाडला फडशा, हिंस्र श्वापदाच्या वावराने नागरिक भयभीत

प्रतिनिधी 

Feb 05,2019 10:26:00 AM IST

नाशिकरोड - मखमलाबाद परिसरात बिबट्याच्या वावराने नागरिक भयभीत झाले असतानाच दुसरीकडे नाशिकरोड परिसरातील एकलहरे येथील वाळू वाट शिवारातील नावाडकर मळ्यात बिबट्याने आठ कोंबड्या फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी रात्री २ च्या सुमारास शेतातील घराबाहेर कोंबड्यांच्या जाळीवर बिबट्याने हल्ला चढविला तेव्हा पक्ष्यांच्या कलकलाटाने योगेश व त्यांचे भाऊ राजाराम यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्याने कांेंबड्यांवर झडप घातल्याचे दिसले. त्यांनी घरातून बॅटरी व काठ्या अाणल्या. एकाने गाडी सुरू करून उजेड व हॉर्नचा कर्कश आवाज केला व बिबट्याला पळवून लावले. राखेच्या बंधाऱ्यापासून हा मळा अर्धा किलोमीटरवर आहे. परिसरातील बहुतांश ऊसतोड झालेली आहे व राखेच्या बंधाऱ्यात बेशरम व बाभळीचे जंगल मोठे असल्याने लपण्यास जागा भरपूर आहे. त्यामुळे बिबट्याचा प्रादुर्भाव व जनावरांवर हल्ले नेहमीचे झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बंधाऱ्यालगतच्या हिंगणवेढे, सामनगाव, कोटमगाव शिवारात शेतमळ्यातील जनावरांवर हल्ले होत आहेत. साेमवारी सकाळी गावातील संदीप पवळे व नावाडकर यांनी वनअधिकारी रवी भोगे यांच्याशी संपर्क साधून रात्रीच्या घटनेबाबत माहिती दिली. दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन शेताची व बिबट्याच्या ठशांची पाहणी केली. या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शांताराम राजोळे, अशोक पवळे, ज्ञानेश्वर पवळे, बबन राजोळे, राजाराम भवर, राजू जाधव आदी शेतकऱ्यांनी केली आहे.


X
COMMENT