आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेळ्या चारणाऱ्या युवकासह वृद्ध इसमावर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एक अठरा वर्षीय युवकावर तसेच जनावरांना चारा पाणी करणाऱ्या एका पासष्ट वर्षीय वृध्दावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २७ जून राेजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील घुटी शिवारात घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


  येथून काही अंतरावर असलेल्या उटी येथील दत्ता मधुकर आमले वय १८ हा युवक आज दुपारच्या सुमारास घुटी शिवारात बकऱ्या चारत होता. एवढ्यात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने त्याच्या हातापायाला चावा घेवून जखमी केले. त्याने आरडोआेेरडा केला असता शेजारील लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. ग्रामस्थ येत असल्याचे पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली. तर त्याच वेळी जनावरांना चारा पाणी करणाऱ्या घुटी येथील लक्ष्मण पनाळकर वय ६५ यांच्यावर त्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते सुध्दा गंभीर जखमी झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धाव घेवून त्यांची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली. त्यानंतर दोन्ही जखमीना येथील अनघा हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.


सध्या पावसाळ्याचे व पेरणीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी व शेत मजूर हे शेतात काम करण्यासाठी जात आहेत. परंतु ही घटना घडल्यामुळे त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...