आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भालगाव परिसरात तीन जणांवर बिबट्याचा हल्ला, दोघांवर घाटीत उपचार सुरू, वीरगाव ठाणे हद्दीतील घटना 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - वैजापूर तालुक्यातील भालगाव शिवारात शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे बिबट्याने हैदाेस घातला. भालगाव शिवारात शेतवस्तीवर राहणाऱ्या एका महिला व पुरुषावर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. तर रविवारी पहाटे साडेचार वाजता भालगावपासून काही मीटर अंतरावरील गोवर्धन (ता. श्रीरामपूर) येथे एका ऊसतोड महिलेवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रभान दामाेदर शिंदे (वय ९०) व नर्मदा तात्याबा राहिंद (वय ७०) रा. भालगाव आणि लक्ष्मी शिवाजी पवार (वय ५५) रा. गोवर्धन अशी जखमींची नावे आहेत. 

 

नर्मदा राहिंद यांचा मुलगा दादासाहेब राहिंद यांनी सांगितले की, भालगाव शिवारात अनेक जण शेतात वस्ती करून राहतात. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अंगणात झोपलेल्या नर्मदा राहिंद यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने हल्ला केल्याने त्या जिवाच्या आकांताने ओरडू लागल्याने घरात झालेली मंडळी बाहेर आली. नर्मदा यांच्या आेरडण्याने बिबट्या पळाला. थोड्याच वेळात बिबट्याने चंद्रभान शिंदे यांच्यावरही हल्ला केला. चंद्रभान यांच्या मुलाने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी हापूस वडगाव येथे एका शेतकऱ्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला केला हाेता. मात्र आमच्या गाव व परिसरात यापूर्वी कधीही बिबट्याचा हल्ला झाला नाही. जखमी नर्मदा राहिंद व चंद्रभान शिंदे यांचे जबाब वीरगाव पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक हरिशकुमार बाेराडे व पाेलिस हवालदार संदीप गायकवाड यांनी नाेंदवले आहेत. 

 

दोन गावांत नदी आडवी 
वैजापूर तालुक्यातील भालगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन या दोन गावांत केवळ गोदावरी नदी आडवी आहे. शनिवारी रात्री दोघांवर हल्ला करणारा बिबट्या पहाटे ऊसतोड कामगारांच्या फडावर पोहोचला. रविवारी भल्या पहाटे म्हणजे साडेचारच्या सुमारास बिबट्याने लक्ष्मी शिवाजी पवार यांच्यावर हल्ला केला. यात लक्ष्मी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...